गृहमंत्री पदाची पूजा घाला! डोंबिवलीत मिंधे टोळीने डॉक्टर, नर्सला केलेल्या मारहाणीवरून संजय राऊत आक्रमक
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात मिंधे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिला डॉक्टर आणि नर्सना केलेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. या धक्कादायक घटनेवरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मिंधे टोळीवर हल्ला चढवला आहे. सन्मानीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपल्याकडील गृहमंत्री पदाची पूजा घाला, असा सणसणीत टोला राऊत यांनी लगावला आहे.
डोंबिवलीतील या मारहाणीच्या घटनेचे वृत्त समोर आल्यानंतर संजय राऊत यांनी एक्सवर एक खरमरीत पोस्ट लिहिली आहे. ज्या पांढऱ्या कपड्यातील देवदूतांनी कोरोना काळात स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता जनतेची सेवा केली, त्याच महिला डॉक्टर आणि नर्सना मिंधे टोळीचे गुंड इस्पितळात घुसून अमानुष मारहाण करतात. हे काय महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी पोलीस प्रशासनाला आणि गृहमंत्र्यांना थेट आव्हान दिले आहे. मिंधे टोळीतील सर्व आरोपींच्या हातात बेड्या ठोकून, त्यांची चड्डी-बनियानवर वरात काढली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
सन्मानीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी आपल्याकडील गृहमंत्री पदाची पूजा घाला!
ज्या पांढऱ्या कपड्यातील देवदूतांनी करोना काळात जनतेची सेवा केली,
त्या महिला डॉक्टर आणि नर्स ना मिंधे टोळीचे गुंड इस्पितळात घुसून अमानुष मारहाण करतात
हे काय कायद्याचे राज्य आहे?
या सगळ्यांची हातात बेड्या… https://t.co/GLKtRxFhVj— संजय राऊत (@rautsanjay61) 8 जुलै 2026
नेमकं प्रकरण काय?
डोंबिवली पश्चिम येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर नवजात बाळाला जन्मानंतर एनआयसीयू उपचारांची आवश्यकता लागू शकते, अशी माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. मात्र रुग्णालयातील एनआयसीयूचे सर्व दहा बेड भरले असल्याने संबंधित महिलेला पुढील उपचारांसाठी अन्य रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. याच कारणावरून नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये वाद झाला. त्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयात येऊन महिला डॉक्टर, आणखी एक डॉक्टर तसेच तीन महिला परिचारिकांना मारहाण केली. व्हायरल व्हिडीओमध्ये म्हात्रे मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत. दरम्यान आंदोलनाच्या दणक्यानंतर रमेश म्हात्रे यांच्यासह पाचजणांवर विष्णूनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
सुरक्षारक्षकांना रोखले
मारहाण सुरू असताना कार्यकर्त्यांनी सुरक्षारक्षकांनाही रोखून धरल्याची आरोप महापालिका सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांनी केला. या घटनेनंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. मारहाणीच्या घटनेचा निषेध म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास, उपाध्यक्ष सुनील पवार, सुरेश तेलवणे, तात्यासाहेब माने, सरचिटणीस सचिन बासरे यांच्यासह काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी केला. पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. सादिया पिंजारी यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात मिंधे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिला डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. pic.twitter.com/EzOHrcEGPG
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) ७ जुलै २०२६
Comments are closed.