शिंदेंचा पक्ष भाजपचं अंगवस्त्र, त्यांचा मालक दिल्लीत असल्यानं त्यांना वारंवार जावं लागतं; संजय राऊत यांचा हल्लाबोल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर गेले असून तिथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. शिंदेंचे मालक दिल्लीला असल्याने त्यांना वारंवार जावे लागते, असा टोला राऊत यांनी लगावला. तसेच शिंदेंचा पक्ष भाजपचे अंगवस्त्र असल्याची टीकाही राऊत यांनी रविवारी सकाळी माध्यमांशी बोलताना केली.

संजय राऊत म्हणाले की, शिंदेंचा मालक दिल्लीत आहे. त्यांना दिल्लीत जाऊन त्यांच्या मालकाशी चर्चा करावी लागते. जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा त्यांना मातोश्री किंवा शिवसेना भवनात यावे लागत होते. शिवसेना त्यांना कळत नाही. चोरलेला पक्ष असल्याने त्यांना इतिहास माहिती नाही. शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे आणि प्रादेशिक पक्षाचे नेतृत्व राज्यात असते. प्रादेशिक पक्षाची मुख्य कार्यालयं ही राज्यामध्ये असतात, दिल्लीत नसतात. चंद्राबाबू नायडू पक्षाचे काम घेऊन दिल्लीत जात नाहीत. आता यांचे मालक दिल्लीत असल्याने त्यांना जावे लागते.

शिंदे दिल्ली का गेले हे देखील संजय राऊत यांनी सांगितले. जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्ह कुणाचा यावर सुनावणीची तारीख जवळ येते, तेव्हा यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात. कधी अमित शहांना भेटतात, कधी मोदींना भेटतात. मागच्या तारखेलाही दोन दिवस आधी शहांना भेटले आणि आता ते मोदींना भेटले. सुनावणीची तारीख जवळ येते, तसे यांच्या दिल्लीतील भेटीगाठी वाढतात. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना भेटतात, रडगाणे गातात, छाती पिटतात आणि परत येतात, असे राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, शिंदेंची जमिनीवरची ताकद नक्की किती हे मोदी-शहांन माहिती आहे. त्यांनी त्यांना आमच्याविरुद्ध, महाराष्ट्राविरुद्ध, मराठी माणसाविरुद्ध वापरून घेतले. आता शहा-मोदींचा त्यांना थेट सल्ला आहे की, महानगरपालिका निवडणुका झाल्यावर तुम्हाला तुमचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन करावा लागेल. मी सांगतोय यात सत्य आणि तथ्य आहे. कारण कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही कायद्याच्या आधारे ते सुप्रीम कोर्टात आपला बचाव करू शकत नाहीत. हे सगळ्यांना माहिती आहे आणि तसा प्रकार, प्रयत्न झाला तर या देशातील जनतेचा नव्हे तर जगाचा भारतीय न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडेल.

भारताची लोकशाही, न्यायव्यवस्था, संविधान या संदर्भात जगाच्या मनात शंका उत्पन्न झाल्या आणि त्याच्यात सर्वोच्च न्यायालयातील शिवसेनेचे हे राजकीय प्रकरण महत्त्वाचे आहे. तुम्ही कशाप्रकारे लोकांचे पक्ष फोडता, मूळ पक्ष एखाद्याच्या ताब्यात देता आणि राजकारण करता, कशाप्रकारे पक्षांतरबंदी विरोधी कायद्याच्या चिंधड्या उडवता. या सगळ्याची नोंद जगाच्या व्यासपीठावर होत असते, म्हणून काल शिंदे हे लपटलेल्या अवस्थेत मोदींना भेटले, असेही राऊत म्हणाले.

देवाच्या घरी उशीर आहे, अंधार नाही!

संजय राऊत पुढे म्हणाले की, आमचा अजूनही न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. भगवान के घर देर है, अंधेर नहीं. ठीक आहे, तारखांवर तारखा पडलेल्या आहेत, पक्ष चोरला, एक निवडणूक चोरली, बहुमत चोरले. हे सगळे जरी असले तरी न्याय हा सत्याच्या बाजूने लागेल. हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही नरेंद्र मोदी आणि शहांच्या 100 पिढ्या उतरल्या तरी चोरता येणार नाही. बाळासाहेबांचे मोठे पुण्य महाराष्ट्राला मिळाले आहे, ते पुण्य चोरता येणार नाही. तुम्हाला सत्य आणि न्याय समोर ठेऊन न्याय करावा लागेल. त्याच्यामुळे शिंदेंनी कितीही बेडूक उड्या मारल्या तरी सुप्रीम कोर्टाला त्यांची प्रतिष्ठा राखण्यासाठी, संविधानाची प्रतिष्ठा राखण्यासाठी न्याय करावा लागेल नाही तर देशातील 140 कोटी जनतेचा विश्वास न्याय व्यवस्थेवरील पूर्णपणे उडून जाईल.

Comments are closed.