आभाळ फाटलं, जमीन वाहून गेली, लोकांचा आक्रोश सुरूय अन् सरकार दांडियात नाचतंय; निर्लज्जपणाचा कळस आहे! – संजय राऊत

मराठवाडा, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आभाळ फाटले आहे. कोकणातही मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. जमीन वाहून गेली आहे, लोकांचा आक्रोश सुरू आहे. पण सरकार क्रिकेटच्या मॅचचा बंदोबस्त करण्यात, दांडियात नाचण्यात व्यस्त आहे. हे सरकार म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे, असा जोरदार घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. रविवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.

सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी प्रमुख अधिकाऱ्यांसह संभाजीनगरला जाऊन थांबणे गरजेचे होते. लातूर, नांदेडला जाऊन थांबणे गरजेचे होते. कशाप्रकारे मदत पोहोचेल हे बघायला हवे होते. कारण लोकांना चार-चार दिवस अन्न पाणी मिळालेले नाही. घरं वाहून गेलेी, निवारा नाही. आपण मुंबईत नागपुरात काय करताय? हा प्रश्न फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नाही मंत्रिमंडळाला प्रश्न आहे. अत्यंत कामचुकार मंत्रिमंडळ आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, तुम्ही आतापर्यंत किती मदत केली? कुणाला मदत पोहोचली याचा हिशेब देऊ शकता का? आतापर्यंत खासगी संस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय कार्यकर्त्यांनी जेवढी मदत दिली आहे त्याच्या पलीकडे सरकारकडून कोणतीही मदत मिळू शकलेली नाही. आमच्या शिवसेनेचे लोक मदत करत आहेत, पण त्यांना मर्यादा आहेत. आभाळ फाटलं, जमीन वाहून गेली आहे. अशावेळी पूर्ण मदत ही सरकारकडूनच व्हायला पाहिजे. पण सरकार क्रिकेट मॅचच्या बंदोबस्ताला लागले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या तयारीला लागले. आयपीएल कसे होणार त्या बंदोबस्तात लागले. शेतकऱ्यांचे त्यांना काही पडलेले नाही.

मराठवाडा, अहिल्यानगर, जळगावचा काही भाग पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. कोकणात जोरात पाऊस सुरू असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी काय योजना आहे? एक दौरा केला चार तासाचा परत आलात. तुमचे मंत्री कुठे आहेत? पालकमंत्री कुठे आहेत? धाराशिवचे पालकमंत्री दोन टेम्पोला फोटो लावून गेले, ते आता कुठे आहेत? पालकमंत्र्यांनी पूरग्रस्त जिल्ह्यात ठाण मांडून बसले पाहिजे. मुंबईला काय करताहेत पालकमंत्री, कशाकरता नेमले पालकमंत्री? अशा मंत्र्यांना बडतर्फ केला पाहिजे, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला.

पालमकंत्री दांडियाला नाचतात. गरब्याला जाऊन बसतात आणि आम्हाला तुम्ही काय केले विचारतात. सरकार कुणाचे आहे? सत्ता कुणाची आहे? तिजोरी कुणाच्या हातात आहे? निर्लज्जपणाचा कळस आहे. उद्या अमित शहा, नरेंद्र मोदी येणार आहेत. त्यांच्या मागे लटांबर धावत जाणार. मुळात अशा परिस्थितीत मोदींनी यावे आणि सगळी यंत्रणा विस्कळीत करावी हे त्यांना कळत नाही का? त्यांनी मराठवाडा दौरा करावा. भले हेलिकॉप्टरमधून करा, पण करा. शहांनी करावा. लोकांचा आक्रोश पहावा, असेही राऊत म्हणाले.

देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली कॅबिनेटला तुरुंगात टाकायला पाहिजे! संजय राऊत भडकले, IND vs PAK सामन्याला कडाडून विरोध

Comments are closed.