मोदी-शहांनी केजरीवाल यांची माफी मागावी, दबावाखाली कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खटला दाखल करावा! – संजय राऊत

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यातून आम आदमी पक्षाचे प्रमुख संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 23 जणांची दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयाने निर्दोष सुटका केली. यामुळे मोदी सरकारला सणसणीत चपराक बसली आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी, तसेच दबावाखाली कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांच्यावर खटला दाखल करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. शनिवारी सकाळी ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, अरविंद केजरीवास, मनीष सिसोदिया, राज्यसभेचे खासदार संजय सिंह, काही अधिकारी, व्यापारी यांना सीबीआयने मद्य धोरण घोटाळ्याच्या आरोपांखाली अटक केली होती. राज्याच्या एका लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना जवळजवळ फरफटत घेऊन गेले हे संपूर्ण देशाने पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि तेव्हाचे नायब राज्यपाल हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत होते. या सगळ्यांनी केजरीवाल यांच्या बदनामीची प्रचंड मोहीम राबवली. मद्य धोरणात कोणताही गैरप्रकार झालेला नाही हे केजरीवाल सांगत होते. पण आधी लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी आणि मग विधानसभा जिंकण्यासाठी हा विषय लावून धरण्यात आला. पण काल न्यायालयाने सांगितले की, हा खटला एवढा पोकळ आहे की तो टिकूच शकणार नाही. कोणताही पुरावा नाही, योग्य माहिती नाही. त्यामुळे सगळ्यांची जवळजवळ निर्दोष मुक्तता करण्यात आली.

बातमी अपडेट होत आहे…

केजरीवाल आणि सिसोदियांसह 23 जण निर्दोष; भाजपने बोंबाबोंब केलेला मद्य धोरण घोटाळा बोगस निघाला

हेमंत सोरने यांनाही मुख्यमंत्री असताना अशा प्रकारे अटक करण्यात आली होती. महाराष्ट्रात अनिल देशमुख गृहमंत्री होते, त्यांना तुरुंगात जावे लागले. नवाब मलिक मंत्री होते, त्यांनाही तुरुंगात जावे लागले. मलाही तुरुंगात जावे लागले. कोर्टात कुणी जामिनावर सुटले, कुणाला निर्दोष सिद्ध केले. आमच्यासारख्यांच्या अटका बेकायदेशीर आहे असे ईडी कोर्टाने सांगितले. पण कालचे चित्र जे होते हे खरे म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना चपराक मारणारे होते, असे राऊत म्हणाले.

केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारावर सगळ्यात जास्त आवाज अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी उठवला. लोकसभेला दिल्लीतील 7 जागा जिंकायच्या होत्या आणि विधानसभा त्यांच्याकडून काढून घ्यायची होती म्हणून केजरीवाल यांना तुरुंगात टाकले हे काल सिद्ध झाले. त्यामुळे ज्या सीबीआय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे, पुरावे नसताना केजरीवाल आणि त्यांच्या लोकांना अटक करून तुरुंगात टाकले त्या अधिकाऱ्यांवर गृहमंत्रालयाने कारवाई केली पाहिजे. त्या अधिकाऱ्यांचे निलंबन केले पाहिजे आणि त्यांच्यावर खटले चालवले पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, छगन भुजबळ 22 महिने तुरुंगात होते, शेवटी निर्दोष सुटले. ज्याने हे कृत्य केले त्या ईडी अधिकाऱ्यांवर आणि किरीट सोमय्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. तुमच्यावर आरोप झाले तेव्हा तुम्ही तडफडत कोर्टात गेलात. मग दुसऱ्यांना अब्रू नाही का? छगन भुजबळ निर्दोष सुटलेले आहे. मग ते ईडीच्या अधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याबद्दल काय कारवाई झाली? ज्याने आरोप केले त्या भाजपच्या लोकांवर, किरीट सोमय्यांवर काय कारवाई झाली? आमच्यावर आरोप करणाऱ्यांवर काय कारवाई झाली? त्याच प्रमाणे केजरीवाल यांच्यावर मोदी आणि शहा यांनी आरोप केले. त्यांच्या दबावाखाली सीबीआयने कारवाई केली. त्यामुळे एक तर मोदी-शहांनी केजरीवाल माफी मागायला पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्यांनी दबाबाखाली हे कृत्य केले त्यांचे निलंबन करून त्यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

Comments are closed.