कुलाब्यात उमेदवारांना दमदाटी; विधानसभा अध्यक्षांना हे कृत्य शोभत नाही, संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांना फटकारले

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मुंबईतील कुलाबा मतदारसंघात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही उमेदवारांना दमदाटी केल्याचा आरोप होत आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी थेट प्रतिक्रिया दिली. विधानसभा अध्यक्षांना हे कृत्य शोभत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांना फटकारले.

कुलाब्यात उमेदवारांना राहुल नार्वेकर यांनी दमदाटी केल्याचा आरोप नाही तर ते सत्य आहे. मुळात राहुल नार्वेकर विसरले की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत. विधानसभेचे अध्यक्ष कायद्याचे अभ्यासक आहेत. विधानसभा अध्यक्षाबाबत काही संकेत, नियम असतात. त्यांनी शक्यतो राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचे नसते. ते निष्पक्ष असतात. पण राहुल नार्वेकर आपल्या गळ्यामध्ये कमळाबाईचे उपरणं टाकून त्यांच्या घरातील उमेदवारांचे अर्ज भरायला गेले. म्हणजे राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात ते गेले, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राच्या विरोधी उमेदवारांना धमक्या देतो, प्रशासनावर दबाव आणतोय. या राज्यात काय चालले हे आता विचारायची सोय नाही. पूर्वी आम्ही विचारायचो कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र. आता महाराष्ट्र राहिलाच नाही, तर ठेवायचा प्रश्न कुठे येतो. वाट लावून टाकली आहे. विधानसभा अध्यक्ष ज्या पद्धतीने राजकारणात सक्रिय झाले आहेत, यापूर्वी असे पाहिले नव्हते.

शिवसेनेचे मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ते शिवसेनेच्या व्यासपीठावर उपस्थित राहिले नाही. कारण त्यांच्यावर संविधानिक बंधने होती. दत्ताजी नलावडे विधानसभा अध्यक्ष होते तेव्हाही ते शिवसेनेच्या व्यासपीठावर उपस्थित राहिले नाहीत. आता संविधानाच्या नियमांचा भंग करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री ते पाहताहेत आणि त्यांना उत्तेजन देताहेत. राहुल नार्वेकर यांना त्यांनी केलेले कृत्य शोभत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

कृपाशंकर सिंहांचं विधान अनावधानानं नसून भाजपचं कारस्थान, त्यांना मुंबईत मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाय! – संजय राऊत

4 तारखेला वचननामा, ठाकरे बंधुंची संयुक्त सभा

शिवसेना-मनसेच्या संयुक्त प्रचार सभांबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली. चार तारखेला वचननाम्याचे प्रकाशन होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह उपनगरांमध्ये होतील. मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली, नाशिकला संयुक्त सभा होतील. त्यानंतर उद्धव ठाकरे संभाजीनगरला जाणार आहेत. तिथेही सभा होईल. सध्या आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे वचननाम्यावर काम करत आहेत. मुंबईच्या विकासासाठी, मराठी माणसासाठी ज्या काही योजना आम्हाला अंमलात आणायच्या आहेत, त्याच्यावर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे काम करत आहेत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

Comments are closed.