मुख्यमंत्री पाठिशी असल्याने पार्थ पवारांसारखी प्रकरणं दडपली जातात, संजय राऊत यांची टीका
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक व्हिडीओ शेअर करत टीका केली आहे. त्याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रीया देताना राज्य सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
”मुंढवा जमीन प्रकरण अद्याप संपलेले नाही पण मुख्यमंत्री पाठिशी असल्यामुळे अशा प्रकारचे विषय दडपले जातात. याच ठिकाणी विरोधकांचे नेते किंवा नेत्यांची मुलं असती तर कदाचित हा विषय पुढे गेला असता. त्यात तथ्य नसतं तरी त्यात अधिक माल मसाला टाकून हा विषय पुढे नेला असता. तुम्ही सत्ताधारी एकत्र आहात त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात कायद्यापुढे सगळे समान नाहीत हे सिद्ध होतंय. पार्थ पवार यांच्या प्रकरणातील अहवाल आला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते पाकिट अद्याप खोललेलं नाही. ते पाकिट कधी खोलणार ते माहित नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
डीजीसीएने अजित पवारांच्या अपघाताशी संबंधित कंपनीतील काही विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ” डीजीसीएने एका विशिष्ट जातीच्या विमानाच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. त्या विमानाबाबतचा अहवाल समोर येईपर्यंत ही मनाई करण्यात आली आहे. हा रोहित पवार यांच्या लढाईचा छोटासा विजय होता. अजित पवार यांच्या कुटुंबातील एक तरुण नेता त्यांच्या मृत्युचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतोय. या अपघाता मागच्या खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी तो लढा देतोय. अशा रोहित पवारांच्या पाठिशी आपण उभे राहिले पाहिजे”.
Comments are closed.