हे सरकार डरपोक, विरोधकांच्या भितीपोटी त्यांना विरोधी पक्षनेता नेमायचा नाही; संजय राऊत यांची टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 23 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सर्वच पातळीवर अपयशी ठरल्यामुळे विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी रणनीती आखली आहे. मात्र विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीकडून भास्कर जाधव यांचे नाव देण्यात आलेले असतानाही अद्याप विरोध पक्षनेत्याची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यावर बोलताना शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.

”या सरकारला लाज वाटली पाहिजे. विरोधी पक्षनेत्याशिवाय ते दोन्ही सभागृह चालवायचा प्रयत्न करतायत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून शक्य असेल तिथे विरोधी पक्षनेता देण्याचं टाळतात. राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत पण त्यांना लोकसभेतून कायमचं काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता येऊ नये यासाठी कायदा बदलण्याचे काम सुरू आहे. याला निर्लज्जपणा म्हणतात. तुम्ही लोकशाही मार्गाने सत्तेवर यायचं. मुख्यमंत्री व्हायचं. मंत्रीमंडळ स्थापन करायचं. त्या लोकशाहीत विरोधी पक्षाला जे स्थान आहे ते टाळून बाकी सगळे उद्योग करायचे. लोकशाहीला कलंक लावणारे हे कृत्य आहे. विधानपरिषद विधानसभेत विरोधी पक्षनेता दिला तो अनेक विषय घणाघाती पणे मांडेल, सरकारची कोंडी करेल या भिती पोटी विरोधी पक्षनेता नेमायचाच नाही, ही सरकारची भूमिका असेल तर हे सरकार एक नंबरचे डरपोक आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

”विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव देऊन एक कालखंड लोटला. पण ते म्हणतात भास्कर जाधव नको. हे ठरवणारे तुम्ही कोण? विरोधी पक्षाला हे पद द्यायचं नाही, त्यासाठी कारस्थान केली जातात. महाराष्ट्राच्या ज्या मातीतून आंबेडकरांनी संविधान लिहलं त्या मातीत लोकशाहीची हत्या आणि गळचेपी होत असेल तर याची इतिहासात काळ्याकुट्ट शाईत नोंद होईल, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे”, असेही संजय राऊत म्हणाले.

विधानसभा अध्यक्षांराहुल नार्वेकर यांच्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांविरोधातच अविश्वास दर्शक ठराव आणला पाहिजे असे सांगितले. ”विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर जी व्यक्ती बसलेली आहे त्या व्यक्तीचे पॉलिटीकल कॅरेक्टर पाहता ते नक्की निर्णय घेतील की नाही याबाबत शंका आहे. जी व्यक्ती गावात जाऊन जमिनीचा कब्जा घेण्यासाठी भानगडी करते, जी व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसून पक्षांतराबाबती भपंक निर्णय देते त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास दर्शक ठराव आणला पाहिजे. होऊ दे चर्चा. विधानसभा अध्यक्ष ज्या प्रकारे वागतायत. त्यांची ज्या प्रकारे मनमानी आणि झुंडशाही सुरू आहे. तुम्हाला अधिकार लोकशाही व संविधानाने दिले. त्याच संविधानानुसार तुम्ही विरोधी पक्षनेतेपद द्यायला हवे. त्यावर तुम्ही बोलता की मी पाहिन, तुम्ही पाहणारे कोण? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

Comments are closed.