देशातल्या तपास यंत्रणा गुलाम झाल्या आहेत, लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही – संजय राऊत

”भाजप सत्तेवर आल्यापासून राज्यातल्या, देशातल्या तपास यंत्रणा भाडखाऊ, लाचार, गुलाम झाल्या आहेत. मोदी आल्यापासून कोणताही तपास निष्पक्षपातीपणे झालेला नाही आणि फडणवीस म्हणतात की तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा. या सर्व तपास यंत्रणा फडणवीसांच्या टाचेखाली आहेत हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे तुम्ही तपास यंत्रणांबाबत फाजील आत्मविश्वास दाखवू नका”, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला.

”भाजप सत्तेवर आल्यापासून या राज्यातल्या, देशातल्या तपास यंत्रणा भाडखाऊ, लाचार गुलाम झाल्या आहेत. ईडी, सीबीआय, महाराष्ट्र पोलीस, आयबी अशा अनेक तपास यंत्रणांवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. जे सरकार आपल्या स्वार्थासाठी, आपली कातडी वाचवण्यासाठी देशाला, भारत मातेला ट्रम्पच्या पायाशी गहान ठेवू शकते ते सरकार काहीही करू शकते. मोदी आल्यापासून कोणताही तपास पक्षपातीपणे झाला नाही. भाजपच्या लोकांना क्लिनचीटच देण्यात आली. इतर पक्षातील लोकं भाजपमध्ये गेल्यावर त्यांना क्लिनचीट देण्यात आली. घात अपघात इतर अनेक प्रसंगामध्ये तपास यंत्रणांनी भाडखाऊपणा केलाय. त्यामुळे फडणवीस म्हणतायत की तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा, पण तुमच्या तपास यंत्रणांवर, तुमच्या सरकारवर विश्वास नाही. अहमदाबादच्या अपघाताचं काय झालं. तीनशेच्या आसपास लोकं मारले गेले. दोन सेकंदात विमान कसं पडलं. अजित पवारांना घेऊन जाणारं विमान पण गुजरातमधूनच आदल्या रात्री आलं होतं. लोकांच्या मनात संशय येणारच. तुम्ही तपास यंत्रणांबाबत फाजील आत्मविश्वास दाखवू नका. मिस्टर फडणवीस, न्यायालयापासून सर्व तपास यंत्रणा तुमच्या टाचेखाली आहेत. हे अख्ख्या देशाला माहित आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

”रोहित पवारांनी मांडलेले मुद्दे फडणवीसांनी स्वत: तपासले पाहिजेत. अजित पवारांचा सख्खा पुतण्या प्रेझेंटेशन सादर करतोय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं हे कर्तव्य आहे की या प्रेझेंटेशनवर चर्चा करायला हवं व त्याच्याशी संबंधित अधिकाऱ्याला तिथे बोलवायला हवं. त्याला मी निष्पक्षपातीपणा म्हणेन. पण तुमची उडवा उडवीची उत्तर आहेत, हे सगळं ढोंग आहे. तुमचं दुख ढोंग आहे. या अपघाताचं सत्य पवार कुटुंबाने बाहेर काढलं आहे. काल सुनेत्रा पवार त्यांचे दोन्ही पुत्र प्रफुल पटेल, तटकरे मोदींना भेटले. त्याच वेळी रोहित पवार यांच्या प्रेझेंटेशन बाबत त्यांनी देशाच्या पंतप्रधान व गृहमंत्र्यांशी देखील बोलायला हवं होतं. याबाबत सुनेत्रा वहिनींनी चर्चा केली असती तर तपासाला गती आली असती”, असेही ते म्हणाले.

”हा संपूर्ण प्रकार संशयास्पद आहे. रोहित पवारांनी सांगितलेल्या प्रत्येक मुद्द्याची चौकशी व्हायला हवी. तो पूर्व विदर्भातला नेता कोण, कोणत्या पक्षाचा? कोणत्या फाईलवर सही हवी होती ज्याच्यासाठी अजित पवारांना दोन तीन तास खोळंबून ठेवलं होतं. अशी कोणती फाईल होती ज्याने महाराष्ट्राचा विकास गती थांबली असती. अजित पवारांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईल होत्या. त्या फाईल ताब्यात देण्यासाठी ते नेते आले होते का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Comments are closed.