देवेंद्र फडणवीस कृषी मंत्र्यांना संरक्षण देतायत हा शेतकरी वर्गाचा अपमान, संजय राऊत यांची टीका

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान भवनात जंगली रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी माणिकराव कोकाटे व सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. तसेच ”मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वाढदिवशी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन शेतकऱ्यांना भेट दिली पाहिजे”, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.

”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या वाढदिवशी माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या असंवेदनशील कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेऊन शेतकऱ्यांना भेट दिली पाहिजे. असंवेदनशील, अकार्यक्षम असा कृषीमंत्री सातत्याने महाराष्ट्राला लाभला, आधी दादा भुसे कृषी मंत्री होते त्यांचा शेतकऱ्यांना कधी फायदा झाला नाही. आता कोकाटेंनी तर कहर केला आहे. कृषीमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे. त्या ओसाड गावच्या पाटीलकीत मन रमत नाही म्हणून विधीमंडळात रमी खेळत बसतात. का इतके दिवस त्यांना मंत्रीमंडळात ठेवलं आहे ते कळत नाही. अशी काय मजबुरी आहे की अशा लोकांना मंत्रीमंडळात ठेवलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र ओरडून सांगतोय, आक्रोश करतोय, त्यावरून हाणामाऱ्या सुरू आहेत. तरीही देवेंद्र फडणवीस कृषी मंत्र्यांना संरक्षण देतायत हा शेतकरी वर्गाचा अपमान आहे. कोणत्याही परिस्थित कृषी मंत्र्याना राजीनामा द्यावाही लागेल व घ्यावाही लागेल”, असे संजय राऊत म्हणाले.

”या महाराष्ट्रात फक्त विरोधी पक्षाला टार्गेट केलं जातंय, माणिकराव आमचे व्यक्तीगत शत्रू नाही. शेतकऱ्यांच्या विषयांवर अजिबात गांभिर्याने काम न करणारे कृषी मंत्री या राज्याला लाभले असतील तर त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार विरोधी पक्षाला दिला आहे, असेही ते म्हणाले.

Comments are closed.