देशात सिलेंडरचा तुटवडा नाही ही सरकारकडून पसरवली जाणारी अधिकृत अफवा – संजय राऊत
”आतापर्यंत मुंबईत रिअल इस्टेटचे दर वाढत होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेने मुंबईतील गटारे, नाले यांची किंमत वाढली आहे. असा पंतप्रधान जगात झाला नाही; असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गटारतून तयार होणाऱ्या गॅसच्या वक्तव्यावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला बोल केला. तसेच यावेळी त्यांनी देशात सिलेंडरचा तुटवडा नाही ही सरकारकडून पसरवली जाणारी अधिकृत अफवा असल्याचेही म्हटले आहे.
”आखाती देशातील युद्धामुळे देशाला अत्यंत गंभीर परिस्थितीला तोंड द्यावं लागतंय. LPG चा तुटवडा नाही, सर्व काही अलबेल आहे. इंधनाची टंचाई होणार नाही, सिलेंडरचे भाव वाढणार नाही अशा अफवा सरकारकडून अधिकृतरित्या पसरवल्या जात आहे. पण प्रधानमंत्री मोदी हे पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडूत अशा राज्यात प्रचारात अडकले आहेत. त्यांच्या प्रचाराच्या भाषणात याचा उल्लेख नाही. सिलेंडरसाठी रांगा लागल्या आहेत. 25 दिवस सिलेंडर मिळणार नाही असं चित्र आहे. असंघटित कामगार जे सर्वाधिक हॉटेल इंडस्ट्रीत आहेत. ती इंडस्ट्री LPG अभावी चाळीस टक्के बंद आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पंतप्रधान गृहमंत्री एक शब्द बोलत नाही. ”नोटबंदीच्या वेळी जशा रांगा लावून माणसं मारली गेली. तेच आता सिलेंडरच्या रांगेत होईल असं भयंकर चित्र देशभरात दिसतंय. हे सरकार जनता विरोधी आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात अपयशी ठरल्याने ही परिस्थिती आपल्यावर ओढावली आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
”इराणसोबत संवाद झाला आहे अशा अफवा हिंदुस्थानकडून पसरवल्या जात आहेत. इराणकडून असं सांगण्यात आलेलं नाही. इराणशी संवाद होणं गरजेचं आहे. पण कोणत्या तोंडाने संवाद करणार आहेत. ज्या इराणचा सर्वोच्च नेता इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेला त्यासंदर्भात प्रधानमंत्र्यांनी साधी शोकसंवेदना व्यक्त केली नाही. आता इराणला नैतिक पाठबळ देणं गरजेचं आहे. हिंदुस्थानने तटस्थ भूमिका घेऊन इराणच्या दुखात सहभागी होणं गरजेचं होतं. 200 पेक्षा जास्त कोवळ्या बालिकांची हत्या या युद्धात झाली ही अत्यंत दुखद घटना आहे. त्यावर अजुनही शोकसंवेदना व्यक्त झाली नाही. फक्त होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाचे टँकर सोडा इथपर्यंत इराणचा संबंध आहे का? तर नाही इराणशी आमचे राजनैतिक संबंध आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.
”मोदींनी आतापर्यंत सगळं अदानींना विकलं, फक्त काही नदी, नाले, गटारं शिल्लक होते. त्यातली मिठी नदी आहे. मोदींनी जी गटार गॅस योजना सांगितली आहे ती मिठी नदीच्या माध्यमातून साकार होऊ शकते. त्यामुळे आता गटारांची किंमत वाढली आहे. आतापर्यंत मुंबईतल्या रिअल इस्टेटची किंमत वाढली होती. आता मोदींच्या कृपेने मुंबईतली गटारे, नाले यांची किंमत वाढली आहे. असा पंतप्रधान जगात झाला नाही. आम्ही मोदींच्या योजनेला पाठिंबा देत आहोत. ताबडतोब फडणवीसांनी ओएनजीसी कार्यालयात जाऊन मिठी नदी ताब्यात घेत सुरुवात करावी’, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
Comments are closed.