Sanjay Raut targeted BJP while commenting on the Delhi Assembly election results


मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपाने 27 वर्षांनंतर दिल्लीत कमळ फुलवले आहे. भाजपाने बहुमताचा आकडा पार करत एकहाती सत्ता मिळवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 2020 प्रमाणेच काँग्रेसला यंदाही भोपळा फोडता आलेला नाही. तर दुसरीकडे आपचे दोन मोठे नेते म्हणजेच माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पराभवाचा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाच्या पराभवावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. (Sanjay Raut targeted BJP while commenting on the Delhi Assembly election results)

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, दिल्ली विधानसभा निवडणूक हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी एक कलमी कार्यक्रम होता आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड मोठी फौज दिल्लीमध्ये उतरवली होती. गेली 10 वर्षे अरविंद केजरीवाल यांचं राज्य दिल्लीमध्ये होतं. त्यांच्या कारभाराविषयी बऱ्याच टीका-टिपण्या होत आहेत. असे असले तरी लोकांनी त्यांना 10 वर्षे निवडून दिले होते. आंदोलनातून आलेल्या पक्षाला लोकांनी सत्तेवर बसवले होते. यानंतर त्यांनी त्यांच्यापद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी जी काही महाशक्ती आहे, सत्ता, पैसा आणि यंत्रणा यांच्यापुढे त्यांचा यावेळेला निभाव लागू शकला नाही, असे राऊत यांनी म्हटले.

संजय राऊत म्हणाले की, मोदी, शहा आणि त्यांच्या पक्षाने महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीत राबवला. मतदार यादीमध्ये बाहेरच्या लोकांची नावे घुसवणे आणि ज्या भागात आप पक्षाला नक्की विजय मिळेल किंवा मताधिक्क मिळेल, तेथील मतदार यांच्यामधून हजारो नावं गायब करण्याचा प्रयत्न झाला. ही गोष्ट महाराष्ट्रात देखील झाली. असे सर्व उपक्रम भाजपाने राबवले. एका-एका घरातून तीनशे ते चारशे नावांची नोंदणी मतदार यादीत झाली. दिल्लीत जे बंगले रिकामे आहेत, तिथून सुद्धा मतदारांची नोंदणी झाली आहे. अरविंद केजरीवाल साधारण 1200 मतांनी हरले. कारण त्यांच्या मतदारसंघातल्या अनेक बंगल्यातून साधारण दोनशे ते तीनशे मतांची नोंदणी झाली, जे तिथले रहिवासी नाहीत, असा दावा राऊत यांनी केला.

हेही वाचा – Arvind Kejriwal : विरोधी पक्षाची भूमिका निभावणार नाही…; निवडणूक निकालावर केजरीवालांचे मोठे वक्तव्य

संजय राऊत म्हणाले की, या पराभवाचे मुख्य कारण काँग्रेस आणि आप या वेळेला वेगळे लढले. आतापर्यंत ते वेगळे लढत होते, पण या वेळेला भाजपासारखा शत्रू समोर लढत आहे, याचे भान ठेवून जर इंडि आघाडीतील दोन प्रमुख पक्ष एकत्र आले असते तर नक्कीच आजचा निकाल वेगळा दिसला असता. केजरीवाल यांचा पक्ष आणि भाजपामध्ये फार मोठं अंतर नाही. त्या दोघांमध्ये फार तर फार दोन टक्के अंतर आहे. पण काँग्रेसने साधारण साडेसात टक्के मत घेतली आहेत. म्हणजे 50 टक्क्यांच्यावर काँग्रेस आणि आपची मतं आहेत. उमेर अब्दुला यांनी जे सांगितले ते सत्य आहे. आपण भांडत बसायचे आणि मोदींचा विजय झाला की, छाती पिटत बसायची, असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला.

इंडि आघाडीच्या भवितव्यावर काय म्हणाले संजय राऊत? 

काँग्रेसला खातं उघडता आलं नाही आणि केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. अशावेळी इंडि आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया, सौरभ भारद्वाज, सतेंद्र जैन, गोपाळ राय यांचा पराभव झाला आहे. आतिषी मार्लेना यांना सोडल्यास त्यांचं कॅबिनेट पराभूत झालं आहे. आपचे जे प्रमुख आधारस्तंभ होते, ते सर्व पराभूत झाले आहेत. लोकांनी या सर्वांना मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आहे, पण तरीही ते पराभूत झाले. कारण ज्या पद्धतीने समोरून हल्ले झाले, ज्या पद्धतीने घोटाळे झाले असे मी म्हणतो. पण निवडणुकीमध्ये या गोष्टींवर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. हार आणि जीत या दोनच गोष्टीला महत्त्व असते, असे म्हणत संजय राऊत यांनी इंडि आघाडीच्या भवितव्यावर भाष्य करणं टाळलं.

हेही वाचा – Swati Maliwal : माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्यांना…; मालीवाल यांचा रोख कोणाकडे?



Source link

Comments are closed.