तेच मशिन, तेच आकडे, तोच पैसा; नगपरिषद निवडणुकांच्या निकालांवरून संजय राऊत यांची भाजपवर टीका

“तेच आकडे, त्याच मशिन आणि तीच सेटिंग. आकड्यांमध्ये कोणताही बदल झाला नाही. भाजपने मशिन विधानसभेसारख्याच सेट केल्या. त्यांनी यावेळी निदान आकडे तरी बदलण्याची गरज होती,” असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. नगपरिषद निवडणुकांच्या निकालांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपवर टीका करत असं म्हटलं आहे.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “विधानसभांचे निकाल पाहिले तर तेच आकडे आहेत. मशिन तशीच सेट आहे. १२०-१२५ भाजपला करेक्ट तेच आकडे. विधानसभेला व इथेही शिंदे गटाला ५४ चा आकडा आणि अजित पवार गटाला ४०-४२ जागा. आकडे तेच आहेत ना. त्याच मशिन, तीच सेटिंग आणि तोच पैसा. ही आपली लोकशाही आहे. तुम्ही आकडे पाहा ना. आकड्यांमध्ये अजिबात बदल झाला नाही. भाजपने मशिन त्याच पद्धतीने फिट केल्या आहेत. त्यामुळे तेच आकडे दिसत आहेत. त्यांनी निदान आकडे तरी बदलायला पाहिजे होते.”
संजय राऊत पुढे म्हणाले की, “या निवडणुकीत पैशांची गारपिट झाली. त्या गारपिटीपुढे कोण टिकणार? आम्ही उगवलेली व पेरलेली शेतही त्यापुढे झुकली गेली. ३० कोटी बजेट असलेल्या नगरपालिकेवर भाजप व शिंदे गटाने १५० कोटी रुपये खर्च करत आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीत आतापर्यंत आम्ही प्रचाराला हेलिकॉप्टर व खासगी विमाने वापरली नाही. आम्ही या निवडणुका कार्यकर्त्यांवर सोडल्या होत्या. पण इथे स्पर्धा सत्ताधारी पक्षांतच होती. स्पर्धा आमच्याशी नव्हतीच. सत्तेतील ३ पक्ष एकमेकांविरोधात खेळत राहिले. यामुळे पैशाचा मोठा धुरळा उडाला. पैशांची गारपिट झाली. लोकांनाही सवय झाली आहे. पैसे घेऊन मतदान करायची.”
नगपरिषद निवडणुकांचा हा विजय महायुतीचा आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, “या निवडणुकीत महायुतीचा विजय झाला असेल तर, त्यांनी ही निवडणूक एकमेकांविरोधात का लढली? अमित शहांकडे कशाला गेलात? आम्हाला घ्या म्हणून सांगण्यासाठी. त्यानंतरही नगरपालिकांमध्ये तुम्ही एकमेकांविरोधात लढलात. नगरपालिकांत कुठे महायुती होती. कुणाचीच युती नव्हती. कुणाचीच आघाडी नव्हती. नगरपालिकेत चपराक वगैरे काही नसते. सत्तेचा खेळ असतो. माणसांची फोडाफोडी असते. आता निवडून आलेले नगराध्यक्षही फोडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.”

Comments are closed.