कोई बडा खेला होने वाला है! महाराष्ट्र नाही तर दिल्ली केंद्रस्थानी, संजय राऊत यांचे सूचक विधान

दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. गुरुवारी होणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे एनडीएतील घटकपक्षांचीही बैठक होत आहे. तसेच शहासेनेचे एकनाथ शिंदे यांनीही आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्लीत धाव घेतली आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी मोठे विधान केले आहे.
संजय राऊत म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री दिल्लीत गेले काही दिवस घुटमळत आहेत. दिल्लीत त्यांच्या पक्षाचे प्रमुख बसतात. शिंदे यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आणि त्यांच्या पक्षाचे मार्गदर्शक नरेंद्र मोदी हे दिल्लीत बसल्याने राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खास करून शिंदेसेनेच्या प्रमुखांना येथे येऊन बसावेच लागेल. जसे भाजच्या इतर नेत्यांना हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीत थांबावे लागते, गवतावर बसावे लागते आणि लॉनचे गवत पांढऱ्या इजारीला लावून राज्यात परतावे लागते हा इतिहास आहे. त्यामुळे शिंदेंनाही दिल्लीत थांबावेच लागेल.
शिंदे आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्लीत आल्याने महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणात मोठे घडणार आहे का? असे विचारले असता राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे घडवण्याइतकी मोठी माणसे सरकारमध्ये नाहीत. सरकारमध्ये बसलेली माणसे मोठी नाहीत. महाराष्ट्राला सत्तेमध्ये महान माणसे देण्याची परापंरा होती. भाजपमुळे ती परंपरा खंडित पावली आणि सगळे खुजे, बुळे लोक सरकारमध्ये बसल्याने महाराष्ट्राच्या महान परंपरेला ग्रहण लागले आहे. दिल्लीत येऊन झुकायचे आणि वाकायचे.
उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही दोन-तीन दिवसांसाठी येत आहेत. राहुल गांधी यांच्याबोरबर त्यांची बैठक आहे. इंडिया आघाडीचीही बैठक असून त्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. सायंकाळी शिवसेना खासदारांचीही बैठक होईल आणि त्यानंतर उद्धव ठाकरे कदाचित शरद पवार यांनाही भेटण्याची शक्यता आहे, असेही राऊत यांनी सांगितले. दिल्ली ही देशाची राजधानी आहे. इंडिया आघाडीचे राजकारण इथे चालते. विरोधी पक्षाचे राजकारण दिल्लीतून होत आहे. राहुल गांधी वारंवार म्हणताहेत की, कोई बडा खेला होने वाला है! हे महाराष्ट्रात नाही तर दिल्लीत होणार आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.
पुलवामाचन सत्य दफन?
सत्यपाल मलिक यांच्या निधनानंतर पुलवामाचे सत्य दफन झाले नाही. ते गेल्या पाच सहा वर्षापासून या विषयावर बोलत होते. त्यांनी सत्य बाहेर आणले आणि अखेरचा श्वास घेतला. ते सत्य बाहेर आणल्याबद्दल त्यांच्यावर सीबीआयने खोटे गुन्हे दाखल केले होते. ते संघर्ष करत राहिले. सत्यपाल मलिक यांच्यासारखे नेते संघर्षातून निर्माण होतात आणि शेवटपर्यंत संघर्ष करत राहतात, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले.
Comments are closed.