नागपुरात शिवसेनेचे रामरक्षा आंदोलन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रण, संजय राऊत यांचे पत्र
अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या देणगी चोरीच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक झाली असून रामरक्षा आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा दुसरा टप्पा नागपुरातून 18 जुलैपासून सुरू होणार आहे. नागपुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा असतानाच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नागपूर येथे आयोजित रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचे जाहीर आमंत्रण दिले आहे.
संजय राऊत यांनी पत्रात म्हटले की, “आपण एक प्रखर रामभक्त आणि कडवट हिंदुत्ववादी आहात. अयोध्येतील राम जन्मभूमी मुक्त करण्याच्या आंदोलनात आपण सहभागी झाल्याचे आपण नेहमी सांगता. आपल्यासारख्या लाखो राम भक्तांच्या संघर्षातून राम जन्मभूमी मुक्त झाली व अयोध्येत श्रीराम मंदिर उभे राहिले. याच राम मंदिरात चोरी, लुटमार, फसवणूक असे गुन्हे घडत आहेत व शेकडो कोटींचा अपहार झाला. खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अयोध्येतील चोरीबाबत शोक’ व्यक्त केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या राम मंदिर लुटीबाबत लोकांत जागृती आणण्यासाठी रामरक्षा उपक्रम सुरू केला, रामरक्षा म्हणजे रामाची सुरक्षा हे समजून घ्या.”
“18 जुलै, 2026 शनिवार सायंकाळी 4.30 वाजता राम मंदिर रामनगर, नागपूर येथे, रामरक्षा उपक्रम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत आहे. सदर कार्यक्रम नागपुरात होत असल्याने आपण या ‘रामरक्षा’ उपक्रमात आवर्जुन सहभागी होऊन राम भक्तांना शुभेच्छा द्याव्यात”, अशी आग्रहाची विनंती संजय राऊत यांनी केली आहे.
प्रिय देवेंद्रजी अवश्य यावे
आम्ही आपल्या स्वागतास उत्सुक आहोत,
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/92VdPbhByu— संजय राऊत (@rautsanjay61) 16 जुलै 2026
Comments are closed.