मंत्री संजय शिरसाटांच्या घराबाहेर दारू पिऊन तरुणाचा धिंगाणा, शिवीगाळ, धमक्या देत थयथयाट
छत्रपती संभाजिनगर: पावसाळी अधिवेशनातला राडा, नंतर विधान परिषदेत ऑनलाईन रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंवरून लातूरमध्ये तुफान मारहाणीची घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर तरुणाने दारूच्या नशेत शिवीगाळ करत गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे .यात संबंधित तरुणाने मंत्री शिरसाट यांची वाहने आणि सुरक्षा यंत्रणेलाही लक्ष्य केल्याची माहिती समोर आली असून तरुणाविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय .सौरभ घुले असे दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या तरुणाचे नाव आहे .
नेमका प्रकार काय ?
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानाबाहेर रविवारी रात्री ( 20 जुलै) उशिरा एका तरुणाने दारूच्या नशेत गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे .मंत्री निवास परिसरात गोंधळ घालत त्याने सुरक्षारक्षकांना शिवीगाळ व धमक्याही दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार तरुण प्रचंड नशेत असताना मंत्री शिरसाठ यांना भेटायचे आहे असे म्हणत थयथयाट करत होता .त्याने मंत्री निवासाच्या परिसरात गोंधळ घालत गाड्यांच्या मागे धाव घेतली .सुरक्षारक्षकांना शिवीगाळ करत धमक्याही दिल्याचा प्रकार उघड झालाय . दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांना बोलवण्यात आले .सातारा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने मंत्री शिरसाठ यांच्या बंगल्याबाहेर धाव घेत संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं .त्याच्यावर गुन्हाही दाखल केला . दारू पिऊन सार्वजनिक शांतता भंग केल्याचा व शासकीय व्यक्तींच्या सुरक्षेला बाधा निर्माण केल्याचा ठपका आरोपी तरुणावर ठेवण्यात आलाय . दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर पहारा वाढवला आहे .आता परिस्थिती नियंत्रणात असून घटनेचा अधिक तपास सातारा पोलीस करत आहेत .
कोणत्या व्हिडीओमुळे वाद सुरु झाला? (Manikrao Kokate Rummy Video)
नुकतंच पार पडलेलं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आमदार आणि मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे चांगलच गाजलं. अधिवेशन संपलं पण नेतेमंडळींचे कारनामे काही संपत नाहीय. आमदार संजय गायकवाड, मंत्री संजय शिरसाट, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, भाजपचे पडळकर यांच्यानंतर कृषिमंत्र्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात चक्क ऑनलाईन जुगार खेळतायत असा दावा करत आमदार रोहित पवारांनी हा व्हिडीओ ट्विट केला आणि त्यानंतर राज्यातल्या राजकारणात एक नवा वाद सुरु झाला. एकीकडे राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना कृषीमंत्र्यांचा हा खेळ पाहून नेमकं काय म्हणावं?, असा सवाल उपस्थित केला जातोय.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.