IPL 2025; संघाला मोठा धक्का, राॅयल्सचा कर्णधार गंभीर जखमी

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध 150 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिका 4-1 ने जिंकली. पण या सामन्यादरम्यान, टीम इंडियाचा एक स्टार खेळाडूही जखमी झाला. तो खेळाडू दुसरा कोणी नसून संजू सॅमसन आहे. भारतीय संघाच्या फलंदाजीच्या पहिल्याच षटकात त्याला दुखापत झाली. आता सॅमसनच्या दुखापतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्याबद्दल जाणून घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांना धक्का बसू शकतो.

मुंबई टी20 सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली. सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी आली. इंग्लंडकडून पहिले षटक जोफ्रा आर्चरने टाकले. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सॅमसनने षटकार मारण्यात यश मिळवले. त्याच षटकातील तिसरा चेंडू सॅमसनच्या उजव्या हातवर लागला. यामुळे त्याच्या तर्जनीतून रक्त येऊ लागले. ज्यामुळे फिजिओला मैदानावर येऊन उपचार करावे लागले. यानंतर, सॅमसनने पुन्हा फलंदाजी सुरू केली. परंतु तो फक्त 16 धावा करू शकला.

दुखापतीमुळे, सॅमसन इंग्लंडच्या डावात विकेटकीपिंगसाठी मैदानात उतरला नाही. तर ध्रुव जुरेलने ही जबाबदारी स्वीकारली. दरम्यान आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, सॅमसनच्या बोटाला फ्रॅक्चर झाले आहे. यामुळे सॅमसनला सुमारे 6 आठवडे मैदानापासून दूर राहावे लागणार आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, हा स्टार फलंदाज त्याच्या गावी परतला आहे. जेथे तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याचे पुनर्वसन पूर्ण केल्यानंतरच तो सराव सुरू करेल.

या प्रकरणाची माहिती असलेल्या बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “सॅमसनच्या उजव्या हाताच्या तर्जनीला फ्रॅक्चर झाले आहे. त्याला नेटवर सराव सुरू करण्यासाठी पाच ते सहा आठवडे लागतील. म्हणून, 8 ते 12 फेब्रुवारी दरम्यान पुण्यात होणाऱ्या केरळ संघाकडून (जम्मू आणि काश्मीर विरुद्ध) होणाऱ्या रणजी ट्राॅफीच्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत तो खेळण्याची शक्यता नाही.”

यासोबतच, सूत्राने सांगितले की, आयपीएल 2025 पर्यंत सॅमसन पुन्हा मैदानात परतण्याची अपेक्षा आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत सॅमसनची बॅट पूर्णपणे शांत होती. गेल्या वर्षी उत्तम फलंदाजी कामगिरी करणाऱ्या सॅमसनला या मालिकेतील 5 सामन्यांमध्ये फक्त 51 धावा करता आल्या. यामुळे त्याला बरीच टीकाही सहन करावी लागली.

हेही वाचा-

भारताच्या शानदार विजयानंतर अमिताभ बच्चनने उडवली इंग्लंडची खिल्ली! व्हायरल पोस्ट एकदा पहाच
जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबद्दल मोठे अपडेट समोर, चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये खेळणार की नाही?
ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ स्टार फिरकीपटूला मिळाला ‘टी20 क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार

Comments are closed.