6,6,6,6,6,6… आशिया कपपूर्वी संजू सॅमसनकडून आणखी एक वादळी खेळी, आतापर्यंत ठोकले 30 षटकार

संजू सॅमसन एशिया कप 2025: आशिया कप 2025 ला अवघा आठवडा शिल्लक असताना भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. पण संघात शुभमन गिलचा समावेश आणि त्याला उपकर्णधारपद देण्यात आल्यानंतर बॅटिंग कॉम्बिनेशनबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. कारण गिलचा प्लेइंग-11 मध्ये समावेश जवळपास नक्की मानला जातो.

सलामीच्या शर्यतीत गिल विरुद्ध संजू सॅमसन

काही रिपोर्ट्सनुसार, गिल आशिया कपमध्ये संजू सॅमसनऐवजी सलामीला उतरणार आहे. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनीदेखील सांगितले होते की, गिल संघाबाहेर असल्यामुळे संजू सॅमसनला सलामीला खेळवले जात होते. मात्र आकडेवारी पाहता सॅमसनची सलामीवीर म्हणून कामगिरी गिलपेक्षा कितीतरी चांगली आहे.

KCL मध्ये सॅमसनचा तडाखा

संघ जाहीर झाल्यानंतर सॅमसनने केरल क्रिकेट लीग (KCL) मध्ये धडाकेबाज कामगिरी करून निवडकर्त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. कोची ब्लू टायगर्सकडून खेळताना त्याने रविवारी आलेप्पी रिपल्सविरुद्ध 41 चेंडूत 2 चौकार आणि तब्बल 9 षटकारांच्या मदतीने 83 धावा ठोकल्या. त्याचा स्ट्राईक रेट होता तब्बल 202.44.

पाच डावांत 4 अर्धशतकं, 1 शतक

गेल्या पाच डावांत सॅमसनने चार वेळा 50+ धावा केल्या आहेत.

    • कोल्लम सेलर्सविरुद्ध 42 चेंडूत 13 चौकार आणि 5 षटकारांसह 121 धावांचा शतक ठोकला.
    • त्रिशूर टायटन्सविरुद्ध 46 चेंडूत 89 धावा (4 चौकार, 9 षटकार).
    • अदानी त्रिवेंद्रम रॉयल्सविरुद्ध 37 चेंडूत 62 धावा (4 चौकार, 5 षटकार).
    • आलेप्पी रिपल्सविरुद्ध 83 धावा (2 चौकार, 9 षटकार).

संजू सॅमसनने आतापर्यंत ठोकले 30 षटकार

सॅमसनने आतापर्यंत केवळ पाच डावांत 30 षटकार झळकावले आहेत. सहा सामन्यांत त्याने 73.60 च्या सरासरीने 368 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि तीन अर्धशतके आहेत. या कामगिरीमुळे तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

टीम मॅनेजमेंटसमोर प्रश्नचिन्ह

सॅमसनच्या या विस्फोटक कामगिरीनंतर टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शुभमन गिलला सलामीला उतरवणे योग्य ठरेल का? कारण सॅमसनने आपल्या तुफानी खेळाने सलामीवीर म्हणून दावेदारी अधिकच पक्की केली आहे.

हे ही वाचा –

MS Dhoni Team India Mentor : अरे तो फोन उचलत नाही, मेंटॉर काय होणार? MS धोनी टीम इंडिया सामील होणार ‘या’ बातमीवरून मनोज तिवारी संतापला

आणखी वाचा

Comments are closed.