संजू सॅमसनने रचला इतिहास; 1000 धावा पूर्ण करत रोहितच्या खास क्लबमध्ये प्रवेश!

भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनने अखेर आपल्या जुन्या लयीत दमदार पुनरागमन केले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सलामीवीर म्हणून खेळताना, सॅमसनने अवघ्या 20 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 22 चेंडूंमध्ये 57 धावांची धडाकेबाज खेळी केली, ज्यामध्ये 7 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.
भारताच्या टी-20 विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे यापूर्वी ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा मान मिळवणाऱ्या सॅमसनला त्यानंतर खराब फॉर्मचा सामना करावा लागला होता. त्याच्या मागील पाच डावांमध्ये त्याला 30 धावांचा टप्पाही गाठता आला नव्हता. मात्र, अफगाणिस्तानविरुद्धच्या या आक्रमक खेळीने त्याच्या फॉर्ममधील पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.
या अर्धशतकासह, सॅमसनने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 1000 धावांचा टप्पा ओलांडला आहे आणि दिग्गज भारतीय सलामीवीरांच्या विशेष यादीत स्थान मिळवले आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून भारतासाठी 1000 हून अधिक धावा
3750 – रोहित शर्मा
१८२६- केएल राहुल
१७५९ – शिखर धवन
1726 – अभिषेक शर्मा
1026 – संजू सॅमसन
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 8 गडी गमावून 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारताने 160 धावांचे लक्ष्य अवघ्या 14.5 षटकांत 7 गडी राखून विजय मिळवला. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 88 धावांची दमदार भागीदारी केली. अभिषेकने 19 चेंडूंत 38 धावा केल्या. या दोघांनाही राशिद खानने बाद केले.
त्यानंतर, इशान किशन (38*) आणि तिलक वर्मा (15*) यांनी भारताला सहज विजयाकडे नेले. कर्णधार श्रेयस अय्यरने 11 धावा केल्या. अफगाणिस्तानच्या तिन्ही विकेट्स राशिद खानने घेतल्या. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
Comments are closed.