संजू सॅमसनचे जाणे राजस्थान रॉयल्ससाठी मोठा धक्का; आयपीएलपूर्वी दिग्गज क्रिकेटपटूचे मोठे विधान

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १९ व्या हंगामाची सुरुवात २८ मार्चपासून होत असून सर्व १० संघ आपापल्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील भारताच्या विजयाचा नायक ठरलेला स्टार यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनची जोरदार चर्चा होत आहे. दीर्घकाळ राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करणारा सॅमसन या हंगामात चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडून खेळताना दिसणार आहे.
RR फ्रँचायझीने त्याला सीएसकेकडे ट्रेड केले आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज फाफ डु प्लेसिसने एक मोठे विधान केले आहे. डु प्लेसिसने सॅमसनचे जाणे राजस्थान फ्रँचायझीसाठी मोठे नुकसान असल्याचे म्हटले आहे.
CSK आणि RCB कडून खेळलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु प्लेसिसने ‘जिओ हॉटस्टार’शी बोलताना राजस्थान रॉयल्सबाबत म्हटले की, “जर आपण आयपीएलमधील संघांकडे पाहिले, तर बहुतेक संघांकडे असा एक खेळाडू आहे जो दीर्घकाळ त्या फ्रँचायझीचा चेहरा राहिला आहे, जसे की रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली. मी संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्ससाठी त्याच दर्जाचा खेळाडू मानतो.”
तो पुढे म्हणाला, “संजू जरी नव्या पिढीचा खेळाडू असला, तरी तो त्या फ्रँचायझीचा चेहरा बनला होता. जेव्हा मी राजस्थान रॉयल्सचा विचार करतो, तेव्हा मला संजू सॅमसनची आठवण येते. त्यामुळे त्याचे दुसऱ्या संघात जाणे हे चाहते, आयपीएल आणि संपूर्ण स्पर्धेसाठी एक मोठा धक्का आहे, कारण त्याने तिथे खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे.”
च्यायशस्वी जयस्वालवर दडपण वाढणार
डु प्लेसिसने पुढे असेही नमूद केले की, संजू सॅमसन संघातून बाहेर पडल्यानंतर आता सर्वाधिक दडपण यशस्वी जयस्वालवर येणार आहे. त्याने सांगितले की, सॅमसनच्या उपस्थितीत जयस्वाल मोकळेपणाने आपला नैसर्गिक खेळ करू शकत होता, पण आता परिस्थिती बदलली असून त्याला त्याच अंदाजात खेळणे सोपे नसेल. आता जयस्वालला अतिरिक्त जबाबदारीने कामगिरी करावी लागेल, जे त्याच्यासाठी एक मोठे आव्हान ठरू शकते.
विशेष म्हणजे, संजू सॅमसनच्या जाण्यानंतर राजस्थान रॉयल्सने रियान परागची संघाच्या नवीन कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ आपला पहिला सामना ३० मार्च रोजी गुवाहाटी येथे चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळणार आहे.
Comments are closed.