राजस्थानकडून संजूची चेन्नईला ट्रेड डील कठीण, अश्विनने उदाहरण देत स्पष्ट केली कारणं

गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट विश्वात संजू सॅमसनच्या (Sanju Samson) CSK बरोबरच्या संभाव्य डीलवर चर्चा रंगली होती. पण आता ही डील अडकताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी संजूने राजस्थानकडून स्वत:ला रिलीज किंवा ट्रेड करण्याची विनंती केली होती. चर्चा अशी होती की महान फिरकीपटू अश्विनच्या (R Ashwin) बदल्यात संजूचा ट्रेड होऊ शकतो. अमेरिकेत मेजर क्रिकेट लीगदरम्यान संजूने चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांची भेट घेतल्याने ही चर्चा अजूनच वाढली होती. मात्र आता हा करार खटाईत पडण्यामागचं कारण म्हणजे राजस्थानला संजूची जास्त किंमत (18 कोटी रुपये) मिळवण्यासाठी चेन्नईचे दोन खेळाडू हवे आहेत, जे मिळवणं अत्यंत कठीण आहे.

अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनलवर याबाबत मत व्यक्त करताना सांगितलं, हा करार होण्याची शक्यता कमी आहे. कारण जर संजूचा ट्रेड CSK सोबत झाला आणि राजस्थानने दुसऱ्या संघासोबतही ट्रेड करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना बदल्यात दर्जेदार खेळाडू मिळण्याची शक्यता जवळजवळ नाही.

तो पुढे म्हणाला, उदाहरणार्थ, जर राजस्थानला रवि बिश्नोईसारखा फिरकीपटू हवा असेल आणि त्यांनी लखनऊशी संपर्क साधला, तर समस्या अशी होईल की जर लखनऊने संजूला घेतलं आणि बिश्नोई दिला, तर त्यांना संजू घेण्यासाठी उरलेली रक्कमही व्यवस्थापित करावी लागेल. आणि ती लखनऊची जबाबदारी असेल.

अश्विन म्हणाला, चेन्नई साधारणपणे ट्रेडिंगवर जास्त भर देत नाही. ते जडेजा किंवा शिवम दुबे यांसारखे खेळाडू सोडणार नाहीत. त्यामुळे सॅमसनचा चेन्नईत प्रवेश ही अवास्तव गोष्ट वाटते. कारण ही डील झाली, तरी राजस्थानला त्यातून काही मोठा फायदा होणार नाही.

Comments are closed.