लोकसभेच्या कार्यवाहीचे संस्कृत भाषांतर
द्रमुक खासदारांची विरोधात घोषणाबाजी : लोकसभा अध्यक्षांनी सुनावले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभेच्या कामकाजाचा हिंदी, इंग्रजी समवेत 10 प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद केला जतो, परंतु आता यात आणखी 6 भाषा जोडल्या जाणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याची घोषणा केल्यावर द्रमुक खासदारांनी याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. यावर लोकसभा अध्यक्षांनी द्रमुक खासदारांना चांगलेच सुनावले आहे.
तुमची नेमकी समस्या काय आहे अशी विचारणा लोकसभा अध्यक्षांनी द्रमुक खासदार दयानिधी मारन यांना केली. आम्ही अधिकृत प्रादेशिक भाषांमधील अनुवादाचे स्वागत करतो, परंतु संस्कृत भाषेमधील अनुवादावर आक्षेप असल्याचे मारन यांनी म्हटले. तसेच त्यांनी 2011 च्या जनगणनेचा दाखला देत 73 हजार लोकच संस्कृत बोलतात, संघाच्या विचारसरणीमुळे करदात्यांचा पैसा का वाया घालविला जावा असे प्रश्नार्थक विधान केले.
दयानिधी मारन यांनी लोकसभा कामकाजाचा संस्कृत भाषेतील अनुवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर लोकसभा अध्यक्षांनी त्यांना फटकारले आहे. तुम्ही कुठल्या देशात राहत आहात? हा भारत असून याची प्राथमिक भाषा संस्कृत राहिल आहे. मी 22 भाषांबद्दल बोललो, केवळ संस्कृतबद्दल नाही. तुम्हाला संस्कृतबद्दल आक्षेप का आहे? संसदेत 22 मान्यताप्राप्त भाषा असून हिंदीसोबत संस्कृत भाषेतही अनुवाद होणार असे बिर्ला यांनी द्रमुक खासदारांना सुनावले.
बोडो, डोगरी, मैथिली, मणिपुरी, संस्कृत आणि उर्दू भाषेत सभागृहाच्या कामकाजाचा अनुवाद होणर आहे. जगात भारताची संसदच एकमात्र असे सभागृह आहे जेथे एकाचवेळी इतक्या भाषांमध्ये कामकाजाचा अनुवाद केला जातो. इंग्रजी, हिंदी, आसामी, बांग्ला, गुजराती, कन्नड, मल्याळी, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलगूतही कामकाजाचा अनुवाद केला जातो असे बिर्ला यांनी स्पष्ट पेले.
Comments are closed.