संत भागुबाई
संत तुकाराम महाराजांची मुले त्यांच्या निर्वाणसमयी अल्पवयीन होती. त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाच्या संस्कारांना ती काहीशी मुकली असावीत. यामुळेच संत भागूबाई यांच्या रचना व त्यांचे कार्य याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र तुकारामतात्या संपादित ` श्री तुकोबाराम बाबांचे बंधू कान्होबा, मुलगी संत भागूबाई आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगांची गाथा’ यात त्यांच्या रचनांचा अंतर्भाव आहे. या संपादनात संत तुकाराम महाराजांची कन्या भागूबाईचे दोन अभंग आहेत. या अभंगांत भागुबाईची विठ्ठलभेटीची तळमळ स्त्रीसुलभ भाषेत व्यक्त झाली आहे. वात्सल्यभावातून केलेली ही भक्ती तिच्या स्त्रीमनाचे दर्शन घडवते. ती विठ्ठलाला आळवताना म्हणते, मी रे अपराधी मोठी । मज घालावें बा पोटीं ।
मी तान्हुलें अज्ञान । म्हणू का देऊ नये स्तन । अवघ्या संतां तूं भेटसी । मी रे एकली परदेशी । भागू म्हणे विठोबासी । मज धरावें पोटासी ।
यातील ` तान्हुले’, `स्तनपान’, `परदेशी’ (सासरी ) या शब्दप्रतिमा स्त्रीसुलभ मनाच्या निदर्शक ठरतात. अभंग ही तत्कालीन पारमार्थिक जीवनाची अभिव्यक्ती होती. अभंगात बोलल्याशिवाय आपल्याला प्रकट होता येत नाही, अशीच त्यावेळची धारणा दिसून येते.
Comments are closed.