आरोपी माझ्या जवळचा असला तरी फासावर लटकवा, प्रकरण अंगाशी येताच धनंजय मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण भलतेच तापले आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड हा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने हे प्रकरण मुंडे यांच्या अंगाशी आले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. बीडचे पालकमंत्रीपद त्यांना पुन्हा मिळणार नसल्याचे दिसू लागले आहे. राजकीय कारकीर्दच धोक्यात आल्याने धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांची देहबोली बदललेली होती. बीड हत्येतील आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला फासावर चढवा, असे ते म्हणाले.

संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या झाली. ज्यांनी कुणी ही हत्या केली त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. ते फासावर गेले पाहिजेत, असे माझे पहिल्या दिवसापासून मत आहे. संतोष देशमुखही शेवटी माझ्याच जिह्याचा सरपंच होता. मलाही त्याच्याबाबतीत तेवढाच आदर आहे. आता यात जे कुणी गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा द्या, ते माझ्या जवळचे असले तरी सोडू नका, असे मुंडे यावेळी म्हणाले.

वाल्मीक कराड हे सुरेश धस यांच्याही जवळचे

पत्रकारांनी यावेळी बीडचे भाजप आमदार सुरेश धस व इतर स्थानिक आमदार या प्रकरणात वाल्मीक कराड यांचे नाव घेत असल्याची बाब धनंजय मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर ते म्हणाले, वाल्मीक कराड हे माझ्या जवळचे आहेतच, पण त्यांची जवळीक सुरेश धस यांच्याशीही होती. या प्रकरणात आपल्यावर आरोप करून राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न काही लोक करत असल्याचा दावाही मुंडे यांनी यावेळी केला.

हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला अटक

रिव्हॉल्वरमधून हवेत गोळीबार करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱया परळी येथील कैलास फड याच्यावर दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परळी पोलिसांनी गुरुवारी त्याला शहरातच बेडय़ा ठोकल्या. कैलास फड हा मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्या खास वर्तुळातील आहे. न्यायालयाने कैलासला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

परळी येथील कैलास फड याने रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. कैलास फड याचा हा व्हिडीओ टॅग करून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड जिल्हय़ातील शस्त्र परवान्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. दमानिया यांनी केलेल्या ट्विटनंतर परळी पोलिसांनी परवा रात्री गुन्हा दाखल केला. आज दुपारी पैलास फडला अटक करण्यात आली. त्याच्याकडे शस्त्र परवाना असून जिल्हाधिकारी कार्यालयात त्याची नोंदही आहे. पोलिसांनी त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर जप्त केली.

सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक केजमध्ये दाखल

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे हे गुरुवारी केजमध्ये दाखल झाले. राज्य सरकारने हे प्रकरण अधिक चौकशीसाठी सीआयडीकडे सोपवले आहे. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, पुणे येथील सीआयडीचे अधिकारी बसवराज तेली हे केज येथे आले. शासकीय विश्रामगृहावर या अधिकाऱयांची बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीत हत्या प्रकरणातील तीन आरोपी अजूनही फरार असल्याबद्दल बोरुडे यांनी संताप व्यक्त केला. त्याचबरोबर 28 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱया मोर्चासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

कराड याच्याविरुद्ध ठोस पुरावे असल्याने आणि प्रचंड राजकीय दबाव असल्याने त्याला अटक करून तातडीने कारवाई करावी लागेल, असे फडणवीस यांनी या भेटीमध्ये मुंडे यांना सांगितल्याचे समजते.

Comments are closed.