Santosh deshmukh murder anjali damania demands arrest of valmik karad


मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. हिवाळी अधिवेशनातही त्याचे चांगलेच पडसाद उमटले. या घटनेचे एकूणच गांभीर्य पाहता विविध राजकीय नेत्यांनी तातडीने घटनास्थळी जात देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांनी न्याय देण्याची मागणी केली. (santosh deshmukh murder anjali damania demands arrest of valmik karad)

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांचे नाव सातत्याने समोर येत आहे. याच वाल्मिक करडावरून विरोधक सातत्याने सरकारला धारेवर धरत आहेत. यासोबतच धनंजय मुंडे यांना सरकारमधून वगळण्याची मागणी देखील विरोधक वारंवार घेत आहेत. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. या मुद्द्यावरून त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.

– Advertisement –

हेही वाचा – CM Fadnavis : जाती-जातीमध्ये भेद निर्माण करण्याचे राहुल गांधींचे काम; काँग्रेस नेत्यांच्या परभणी भेटीवर मुख्यमंत्र्यांकडून टीका

याबाबत त्यांनी एका वृत्तवाहिनीकडे आपली भूमिका देखील मांडली. वाल्मिक कराडवर फक्त परळीत 23 गुन्हे आहेत. त्यातही एकेक कलम त्यांच्यावर 4-5 वेळा लागले आहे. म्हणजे हा इतका माहीर गुन्हेगार आहे. आणि तरीही आजपर्यंत फरार आहे. की त्यांना फरार केलं गेलंय, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असल्याचे त्या म्हणाल्या.

– Advertisement –

दाखल गुन्ह्यांचे गांभीर्य पाहिले तर कळेल. कारण, रिव्हॉल्व्हर लायसन्स नसताना आर्म्स ॲक्टखाली ( 3/24 आणि 4/25) गंभीर गुन्हे दाखल आहेत. तरीही हा माणूस अगदी आरामात फिरतो. त्याला काहीच शिक्षा होत नाहीये, हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याची खंत दमानिया यांनी व्यक्त केली. कराड विरोधात भारतीय दंड संहिता कलम 88, 143, 341, 145, 323, 342, 504, 135, 307, 147, 148, 149, 435, 337, 427, 441, 452, 504, 506, 188, 326 या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दमानिया यांच्या ट्वीटमध्ये काय?

वाल्मीक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, 23 सेक्शन्स त्यापैकी अनेक सेक्शन 3 ते 4 वेळा देखिल आहेत. एकूण 45 सेक्शन्स लावले आहेत. इतके गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? त्यांना आधी मविआने थारा दिला आता महायुतीने, असाही दमानिया यांचा आरोप आहे. या प्रकरणानंतर बीडमधून खूप फोन आले. खूप दहशत आहे या सगळ्यांची. लोकांनी जागायचं कसं? असा सवालही त्यांनी विचारला आहे. याचे उत्तर राजकीय नेत्यांना द्यावेच लागेल. कारण या प्रकरणावरून राजकारण होत असले तरी यामुळे बीडच्या जनतेच्या मनात दहशत निर्माण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच वाल्मिक कराडवर ठोस कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना वाल्मिक कराडवर दाखल गुन्ह्यांची संपूर्ण यादी दाखवणार असल्याचे त्या म्हणाल्या. असे लोकं, ज्या धनंजय मुंडे यांचे ते निकटवर्तीय आहेत, यांच्यासारख्या लोकांना मंत्रीपद द्यावसं तुम्हाला का वाटलं असा सवाल विचारणार असल्याचे देखील त्या म्हणाल्या.

हेही वाचा – Delhi HC On Puja Khedkar : पूजा खेडकरने देशाची प्रतिमा मलीन केली; काय म्हणाले दिल्ली उच्च न्यायालय

दरम्यान, या प्रकरणावरून कॉंग्रेत नेता विजय वडेट्टीवार यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा सहकारी आहे, त्यांच्या कंपन्यामध्ये त्याची भागीदारी आहे, त्यांचे मंत्र्यांशी सबंध आहे. थोडक्यात काय तर मंत्र्याच्या जवळचा व्यक्ती असेल तर निष्पक्ष चौकशी होणार नाही, असे सांगत त्यांनी धनंजय मुंडे यांना बाजूला करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar





Source link

Comments are closed.