बीड बंदूक आणि कराड – एकाच जिल्ह्यात 10 हजार शस्त्रांचा धाक

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यातील मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. यात मंत्री धनंजय मुंडे यांचे खास वाल्मीक कराड संशयाच्या भोवऱ्यात आहेत. असे असतानाच बीड जिल्हय़ात 10 हजारांवर अनधिकृत शस्त्रांचा धाक असल्याचे समोर आले आहे.

‘बीड, बंदूक आणि कराड’ असा दहशतीचा खेळ बीड जिह्यात सुरू आहे. जिल्हय़ात खून, मारामाऱ्या, दरोडे, खंडणीवसुलीच्या घटना रोज घडत असून कायदा आणि सुव्यवस्थेचेच ‘शूट आऊट’ झाल्याचे भयावह चित्र आहे. राज्यातील इतर जिह्यांत केवळ 32 ते 243 इतके शस्त्रपरवाने असताना बीड जिह्यात मात्र तब्बल 1222 इतके अधिकृत शस्त्रपरवाने वितरित करण्यात आले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स पोस्ट करून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. परभणीत 32, अमरावती ग्रामीणमध्ये 243 मग बीड जिह्यातच इतक्या मोठय़ा प्रमाणात शस्त्र परवाने का आणि कोणाच्या वरदहस्ताने दिले गेले, असा सवाल त्यांनी विचारला. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचा कार्यकर्ता क्लास फड शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार करतानाचा एक व्हिडीओही त्यांनी पोस्ट केला आहे. परवाना नसताना त्याच्याकडे पिस्तूल आले कुठून असा सवाल करताना, जिह्यात अशी किती अनधिकृत शस्त्रे आहेत, असा सवालही त्यांनी केला.

पाच हजार कट्टे

बीड जिह्यामध्ये अनेकदा नाकाबंदीमध्ये झाडाझडती घेतली गेली. या झाडाझडतीत परवानगी नसणारे बंदुकीचे कट्टे मोठय़ा प्रमाणात आढळले आहेत. दिवाळीत फटाके वाजवले जातात तसे गोळीबाराचे प्रकार बीडमध्ये सर्रास घडत आहेत. कोणाच्याही कंबरेला गावठी कट्टे सापडतात. मराठवाडय़ात अनधिकृत कट्टे विकण्याचे माहेरघर म्हणून बीडकडे बघितले जाते. अवघ्या दहा ते बारा हजारांत कट्टे विकत घेता येतात अशीही माहिती समोर येत आहे. बीड जिह्यात जवळपास पाच हजार गावठी कट्टे असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शिफारशी कोणाच्या ते तपासा-धस

वडिलांच्या नावावर असणारी बंदूक मुलगा चालवतो. धाब्यावर बसून गोळीबार केला जातो. बीड जिह्यात सर्वाधिक शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. या शस्त्र परवान्याला शिफारशी कोणाच्या आहेत याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली.

ती शस्त्रे कोणती – सोनवणे

बीड जिह्यामध्ये 1220 शस्त्र परवाने आहेत. ज्या गंभीर घटना घडल्या आहेत, त्या घटनांसाठी परवाना असणाऱ्या शस्त्रांचा वापर झालेला नाही. म्हणजेच अनधिकृत शस्त्रांचा वापर बीड जिह्यामध्ये सर्रास केला जातोय. जर 1220 परवाने असणाऱ्या बंदुका असतील तर परवाने नसणाऱ्या बंदुका किती असतील, असा सवाल खासदार बजरंग सोनवणे यांनी केला.

बीडमध्ये राष्ट्रपती शासन लावावे अशी स्थिती

एका जिह्यात राष्ट्रपती शासन लावण्याची तरतूद घटनेत नाही; पण सध्या बीडमध्ये राष्ट्रपती शासन लावावे अशी स्थिती आहे. बीडमधील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कधीही भडका उडेल, लोकं रस्त्यावर येतील, दंगल होईल अशाप्रकारचे वातावरण आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली. बीडमधील जनतेचा शासन आणि प्रशासनावरील विश्वास उडाला आहे. मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जायला हवं. ते गृहमंत्रीही आहेत. त्यांचे जे लाडके धनूभाऊ आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी बीडमध्ये जावं, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. बीड आणि परभणीत ज्या घटना घडल्यात त्यावर फडणवीस फक्त थातूरमातूर उत्तर देत आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा आक्रोश मुख्यमंत्र्यांना विचलित करत नसेल तर हे सरकार माणुसकीशून्य आहे, असे राऊत म्हणाले. मोकाट आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात आहेत आणि तुमचेच मंत्री बीडमध्ये जाऊन नौटंकी करत आहेत, महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही मुर्ख समजला का, असा सवाल राऊत यांनी केला.

फरार वाल्मीक कुठे आहे?

अवादा पवनऊर्जा कंपनीकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी धनंजय मुंडे समर्थक वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात कराड फरार असून अजूनही त्याला अटक करण्यात आलेली नाही.

शस्त्र परवाने काल दिलेले नाहीत – फडणवीस

शस्त्र परवाने काही काल दिलेले नाहीत. ते योग्य प्रकारे दिले आहेत की नाही ते तपासावे लागेल. तक्रार आल्यास विचार करू, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Comments are closed.