Santosh Deshmukh murder case Latur Renapur akrosh morcha people demands


लातूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणावरून लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये 50 हून अधिक गावातील नागरिक सहभागी झाले होते. यावेळी या आंदोलनकर्त्यांनी रेणापूरच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. ज्यामध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (Santosh Deshmukh murder case Latur Renapur akrosh morcha people demands)

हेही वाचा : Beed Morcha : सरपंच संतोष देशमुखांची मुलगी धाय मोकलून रडली अन् सर्वच गहिवरले; बीड मोर्चात काय घडलं? 

– Advertisement –

काही दिवसांपूर्वी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. यामधील दोषींना तत्काळ शिक्षा करण्यात यावी, तसेच जे फरार आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा. या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच संतोष देशमुख यांची मुलेदेखील या मोर्चात सहभागी झाले होते. रेणापूर येथील श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आला. विविध सामाजिक संघटना यांनी या मोर्चात सहभाग घेतला होता.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी हा मोर्चा काढत रेणापूर तहसीलदारांना एक निवेदन दिले. यामध्ये अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच, सदर प्रकरण जलद गती न्यायालयात चालवत आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी. तसेच, सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना आणि मस्साजोग येथील ग्रामस्थांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे. तसेच, सदर घटनेत गुन्हा नोंद करून घेण्यास टाळाटाळ करून विलंब करणाऱ्या आणि आरोपीला मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांनाही हत्येचे आरोपी करावे, अशा काही मागण्या यावेळी करण्यात आल्या. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचेदेखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.


Edited by Abhijeet Jadhav



Source link

Comments are closed.