Santosh Deshmukh murder case MP Omraje Nimbalkar demand to hang the accused PPK
धाराशिव : बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिन्याभराचा कालावधी होऊन गेला आहे. या प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. पण संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देऊन त्यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे. याकरिता राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. आज शनिवारी (ता. 11 जानेवारी) धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सहभागी झाले होते. ज्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणात आक्रमक भूमिका मांडली. (Santosh Deshmukh murder case MP Omraje Nimbalkar demand to hang the accused)
धाराशिवमध्ये निघालेला जनआक्रोश मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत म्हटले की, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोन तरुणांच्या महाराष्ट्रात हत्या झाल्या. त्याच्या निषेधार्थ आणि या कुटुंबांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने आज धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला. ही घटना घडल्यानंतर मी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. दीदी आणि तिच्या लहान भावाला मी बघितले. मला स्वतःची आठवण झाली. आपण आज न्याय मागण्यासाठी येत आहोत. पण, आपण स्वतः माणसं आहोत. आपल्यालाही मुलगी आणि मुलगा आहे. त्यांच्यासाठी आपण जगत असतो. त्यांचे भविष्य चांगले व्हावे म्हणून आपण जगत असतो. मुलीला वडिलांचा आधार असतो. नुसते वडील आहेत म्हटले तरी शंभर हत्तीचे बळ त्या लेकराच्या हातात असते. वडिलांना वाटते की मी माझ्या मुलाचा संभाळ करेल, त्याला मोठं करेल, अशा भावना निंबाळकर यांनी व्यक्त केल्या.
– Advertisement –
हेही वाचा… Beed Murder : संतोष देशमुख हत्याकांडातील सर्वात मोठी अपडेट; मकोकामधून वाल्मिक कराडला वगळले
तसेच, ज्या क्षणाला संतोष देशमुख यांना जीवघेणी मारहाण होत होती, ज्यावेळेस त्या माणसाचा जीव जात होता, तेव्हा त्यांच्या मनाला काय वेदना झाल्या असतील? माझ्या पाठीमागे माझ्या लेकरांचे कोण रक्षण करेल? असा विचार त्यांच्या मनात आला नसेल का? ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली, हे बघितल्यानंतर माणूस म्हणून या गोष्टीचा राग येतो का नाही? या गोष्टीची चिड येते की नाही? असे प्रश्न उपस्थित करत खासदार निंबाळकर यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे अशा पद्धतीच्या वृत्तीला तातडीने कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे, त्यांना फाशीपेक्षा दुसरी कुठलीच शिक्षा असू शकत नाही, अशी माणसं समाज व्यवस्थेत जगायच्या लायक नाहीत, त्यांना तातडीने फासावर लटकवण्याचे काम सरकारचे आहे, असेही यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले.
– Advertisement –
तर, जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत संपूर्ण धाराशिवकर तुमच्या कुटुंबाच्या मागे उभे आहे, असे वचन त्यांनी यावेळी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना दिले. 3 जून 2006 ला माझ्या वडिलांची हत्या झाली, आज 18 वर्ष झाले आहेत, अजूनही प्रकरण ट्रायल कोर्टात आहे. सुरेश धस यांना माझी विनंती आहे की, या वृत्तीला जर धडा शिकवायचा असेल, या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर हा खटला फास्टट्रॅक कोर्टाकडे चालवला जावा. वर्ष-दोन वर्षात त्याचा निकाल लावून आरोपींना फासावर चढवावे, अशी मागणी यावेळी खासदारांनी केली. तसेच, आज कुठल्याही समाजाची हत्या झाली की त्याला जातीचा रंग दिला जातो. ही जात नसते तर वृत्ती असते. याचे काय कारण आहे? त्यांना वाटत असते मी पदावर आलो, आमदार, मंत्री झालो, माझ्या पक्षाचे सरकार तिथे आले आहे. दोन-तीन टर्म झाल्यावर त्या माणसाला मस्ती चढते, त्यांना वाटते की सगळंच आपल्या हातात आहे. दोन-तीन खून केले तरी आम्ही पचवू शकतो. त्यामुळे त्या माणसाला आत्मविश्वास येतो आणि मग अशा पद्धतीच्या घटना घडतात, असेही यावेळी खासदार निंबाळकर यांनी सांगितले.
Comments are closed.