Santosh deshmukh murder case walmik karad 7 days police custody


बीड – केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज केज सत्र न्यायालायत महत्त्वाची सुनावणी झाली. एसआयटीने दहा मुद्दे कोर्टात दिले होते, त्याआधारावर 10 दिवसांची कोठडी मागितली होती. कोर्टाने 7 दिवसांची 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्य सरकारने संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. एसआयटी कडून आज (बुधवार) कोर्टात मोठा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच हत्येचा मास्टरमाईंड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड यांचं नाव चर्चेत आहे. हत्येनंतर 22 दिवसांनी तो सीआयडीला शरण आला. त्याला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली. खंडणी प्रकरणात त्याला मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर एसआयटीने कोर्टात महत्त्वाची माहिती सादर केली. आरोपीचे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जवळचा संबंध असल्याचा दावा एसआयटीने केला. त्यालादेखील या प्रकरणात आरोपी बनवल्याचं एसआयटीने स्पष्ट केलं. तसेच वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला. एसआयटीने मकोका कोर्टात वाल्मिक कराडचा ताबा मिळावा यासाठी अर्ज केला होता. तो अर्ज मकोका कोर्टाने मान्य केला. त्यामुळे प्रोडक्शन वॉरंटच्या माध्यमातून वाल्मिक कराड याचा ताबा घेण्याचा मार्ग एसआयटीला मिळाला. यानंतर वाल्मिक कराड याची कोठडी मिळावी यासाठी एसआयटीने वाल्मिक कराडला आज कोर्टात हजर केले. यावेळी एसआयटीने कोर्टात युक्तिवाद करताना अनेक महत्त्वाचे दावे केले आहे.

एसआयटीच्या वकिलांचा कोर्टात युक्तीवाद

वाल्मिक कराड याचा ताबा घेण्यासाठी एसआयटीने कोर्टात धाव घेतली. यावेळी सरकारी वकीलांनी महत्त्वाचा युक्तीवाद केला. वाल्मिक कराड याने संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी इतर आरोपींसोबत फोनवर संपर्क साधला होता. आरोपी आणि विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यासोबत वाल्मिक कराडचे फोनवर संभाषण झाल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. देशमुखांचे 9 डिसेंबरला दुपारी 3 ते 3.15 वाजेदरम्यान अपहरण झाले. त्याच दिवशी दुपारी 3.20 ते 3.40 दरम्यान वाल्मिक कराड आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यासोबत फोनवर संपर्कात होता. त्यांच्यामध्ये वारंवार संभाषण झाले. दहा मिनिटे त्यांच्यामध्ये संभाषण सुरु होते. त्याच दिवशी वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांना धमकीही दिली होती, असेही एसआयटीने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

वाल्मिक कराड हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांची यादीच आज कोर्टात सादर करण्यात आली. या प्रकरणातील वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांच्यासह इतर आरोपींवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. वाल्मिक कराडला मकोका का लावण्यात आला, याचेही संदर्भ सरकारी वकिलांनी कोर्टात दिले.

बीडमधील मकोका कोर्टात वाल्मिक कराडसंबंधीची सुनावणी इन कॅमेरा झाली. कोर्टात न्यायाधीश, आरोपी वाल्मिक कराड आणि त्याचे वकील, तपास अधिकारी आणि सरकारी वकील एवढेच उपस्थित होते.

चाटे, घुले, कराड यांचे परस्पर संबंध काय? 

फक्त फोनवरुन संभाषण केल्याच्या आधारावर मकोका लावण्यात आला का, असा सवाल कोर्टाने सरकारी वकीलांना केला. आरोपींनी संतोष देशमुख यांचे अपहरण कट रचून केले आहे. अपहरणानंतर हत्या करण्यात आली. आरोपी सराईत गु्न्हेगार आहेत. कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे. पकडेल्या आरोपींनी त्याला फरार होण्यासाठी मदत केली का, याची चौकशी करायचे असल्याचे वकिलांनी कोर्टात सांगितले. विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांचे परस्पर संबंध काय आहेत, हेही तपासायचे आहे, असेही एसआयटीने कोर्टाला सांगितले. कराडसह घुले, चाटे हेही फरार होते, याकाळात त्यांना कोणी-कोणी मदत केली. याचीही चौकशी करायची आहे. त्यामुळे कराडची कोठडी आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितले.

कराडची परदेशात संपत्ती…

वाल्मिक कराडची बीडपासून पुण्यापर्यंत अनेक ठिकाणी संपत्ती असल्याचे उघड होत आहे. त्याची परदेशात संपत्ती आहे का, याचाही तपास करायचा आहे, असे सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितले.

“वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा लागू शकत नाही”

वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी वाल्मिक कराडचे नाव कोणत्याही आरोपीने घेतलेले नाही. त्याला चुकीच्या पद्धतीने अटक केली आहे. त्याच्याविरोधात कोणताही पुरावा नाही, त्याच्यावर हत्येचा गुन्हा लागू शकत नाही, असा युक्तीवाद केला. मात्र कोर्टाने एसआयटीने मांडलेल्या दहा मुद्यांच्या आधारे वाल्मिक कराडला सात दिवसांची कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा : हत्येच्या दिवशी वाल्मीक कराडची संतोष देशमुखांना धमकी; न्यायालयात वकिलांचा दावा

 



Source link

Comments are closed.