वाल्मीक कराडचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला

संतोष देशमुख हत्या आणि इतर संबंधित प्रकरणात बीडच्या विशेष मोक्का न्यायालयाने मंगळवारी वाल्मीक कराडची दोषमुक्ती याचिका फेटाळली. विशेष मोक्का न्यायाधिश व्ही.एच.पाटवदकर यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. यावेळी या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित होते.
संतोष देशमुख हत्या आणि इतर दोन प्रकरणातील एकत्रित दोषारोप बीडच्या विशेष मोक्का न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. विशेष मोक्का न्यायाधिश व्ही.एच.पाटवदकर यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या खटल्यातील मोक्का आणि हत्येच्या दोषारोपातून आपल्याला मुक्त करावे यासाठी वाल्मीक कराडच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती, तर सरकार पक्षाच्या वतीने वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. यावरील दोन्ही बाजुंचे युक्तीवाद याआधीच पूर्ण झाले होते आणि न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. मंगळवारी न्यायालयाने हा दोषमुक्ती अर्ज फेटाळला.
दोषारोप निश्चिती लांबणीवर
या प्रकरणात इतर आरोपींच्या वतीने दोषमुक्ती अर्ज दाखल करण्यात आले असून त्यावर 4 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषारोप निश्चिती मात्र लांबणीवर पडली आहे.
Comments are closed.