Santosh Deshmukh’s photo, no words what will be the condition of the Deshmukh family MP Bajrang Sonawane
बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो सोमवारी सोमवारी समोर आले आणि पुन्हा एकदा हत्याकांडाच्या निर्घृण कृत्याला उजाळा मिळाला. संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळजवळ तीन महिने होत आहेत. 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचे मानले जाते. कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. दुसरीकडे पवनचक्की कंपनीकडे मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातूनच हत्या झाल्याचे सीआयडीने सादर केलेल्या चार्जशीटमधूनही समोर आले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा द्यावा ही विरोधकांची आणि महायुतीच्या आमदारांचीही मागणी होती. अखेर संतोष देशमुख यांचे फोटो सोमवारी समोर आल्यानंतर आज (मंगळवार) धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे, पण त्यांचा या हत्याकांडात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आहे त्यामुळे त्यांनाही सहआरोपी केले पाहिजे अशी मागणी खासदार बंजरंग सोनवणे यांनी केली आहे.
फोटो पाहून शब्द फुटत नाहीत…
संतोष देशमुख यांच्या हत्येचा एक व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अत्यंत निर्दयीपणे आरोपींनी त्यांची हत्या केली आणि त्यानंतरही गुन्हेगार हसत होते. हे फोटो पाहून कोणाच्याही काळजाचं पाणी होईल. जनतेमध्ये हे फोटो पाहून संतापाची लाट उसळली त्यामुळेच मुंडेंचा राजीनामा घेण्यात आली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
हत्येचे व्हिडीओ समोर आल्यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आणि मुख्यमंत्री स्वतः अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी गेले असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. काल (सोमवार) रात्री देवगिरी बंगल्यावर एक महत्वाची बैठक झाली. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते उपस्थित होते. त्यात झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान संतोष देशमुख यांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.
बजरंग सोनावणेंचा संतप्त सवाल
संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांना न्याय मिळावा, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही मागणी लावून धरणारे बीडचे खासदार बजरंग सोनावणे म्हणाले, कुठल्या मंत्र्यांना मंत्रीमंडळात ठेवायचं किंवा बडतर्फ करायचं याचा अधिकार मुख्यमंत्री यांना आहे. तो सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतो. गेले तीन महिने ते राजीनाम्यावर चालढकल करत होते.
माणुसकीला काळिमा फासणारी एवढी भीषण घटना आमच्या जिल्ह्यात घडली, ते फोटो पाहून तोंडातून शब्दसुद्धा उच्चारता येत नाही. ते फोटो पाहून आमच्याही काळजात काही होतंय, मग त्या कुटुंबाचं काय होत असेल ? ” असा सवाल खासदार सोनावणे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : Dhananjay Munde : अजित पवारांचे वक्तव्य आणि धनंजय मुंडेंच्या ट्वीटमध्ये तफावत; राजीनामा नेमका कशामुळे
Comments are closed.