Santosh Desmut Murder Devendra Fadnavis taunts opponents over appointment of Ujjwal Nikam
नागपूर : बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला आता दीड महिना उलटत आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. तरीही या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरारच आहे. त्यामुळे त्याला लवकरात लवकर अचक करणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे. मात्र, हे प्रकरण कोर्टात ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीच लढावे, असा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. तशी विनंती सुद्धा सरकारकडून उज्ज्वल निकम यांना करण्यात आली. मात्र, ते यासाठी का नकार देत आहेत, याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याबाबतची माहिती फडणवीसांनी प्रसार माध्यमांसमोर दिली. (Santosh Desmut Murder Devendra Fadnavis taunts opponents over appointment of Ujjwal Nikam Santosh Desmut Murder Devendra Fadnavis taunts opponents over appointment of Ujjwal Nikam )
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, बीड प्रकरणात सर्व माहिती तपास यंत्रणा रोज बाहेर सांगू शकणार नाहीत. कारण तपासामध्ये अनेक गोष्टी गोपनीय ठेवूनच त्याचा तपास केला जातो. त्यामुळे मला असे वाटते की, तपास यंत्रणांवर कोणत्याही प्रकारे दबाव न आणता त्यांना काम करू दिले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही दोषी व्यक्तीला सोडले जाणार नाही, असे मी आश्वस्त करतो. तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करतील, असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सांगण्यात आले. तसेच, यावेळी फडणवीसांनी ज्येष्ठ सरकारी वकील उज्जल निकम यांच्या नियुक्तीबाबत भाष्य केले आहे.
मला एका गोष्टीचे दुःख आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उज्ज्वल निकम यांच्यासारखे एक वकील आपण या प्रकरणी नियुक्त करावे, असा आपला प्रयत्न आहे. यासाठी त्यांना आम्ही विनंती सुद्धा केली आहे. त्यामुळे ते याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास आहे. पण उज्ज्वल निकम हे प्रकरण हाताळण्यासाठी का नकारात्मक आहेत, याचे कारण सांगितले असून ते म्हणाले की, मला या प्रकरणी नेमल्यानंतर विनाकारण काही लोक राजकारण करतील. त्याला राजकीय रंग देतील, जे मला योग्य वाटत नाही, असे निकम यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पण मला असे वाटते की देशामध्ये अनेक वकील आहेत जे वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत किंवा त्यांनी वेगवेगळ्या पक्षामधून निवडणूक लढवली आहे. त्याचे राजकारण होत नाही, असे यावेळी फडणवीसांकडून सांगण्यात आले.
परंतु, उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर राजकारण करणे याचा अर्थ कुठेतरी गुन्हेगारांना मदत करण्यासारखा आहे. कारण उज्ज्वल निकम यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे की त्यांनी एखादी केस लढली तर खऱ्या गुन्हेगारांनाच शिक्षा झाली आहे. त्यामुळे आता विरोधकांना कोणाला वाचवायचे असेल तर ते या प्रकरणासाठी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला विरोध करतील, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. फडणवीसांनी यावेळी सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत देखील प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी जी माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे, तीच माहिती असून पोलीस या प्रकरणी लवकरच योग्य ती कारवाई करतील, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला आहे.
Comments are closed.