Sarangai pravin mahajan attack on dhananjay munde and pankaja munde over santosh deshmukh murder case
बीड – सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या मागे धनंजय मुंडे हेच आहेत. त्यांनाही आत घाला, त्याला सरकारी जेवण जेऊ द्या, अशी मागणी थेट अजित पवारांकडे सारंगी महाजन यांनी केली आहे. सारंगी महाजन या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या मामी आहेत. कुटुंबातील व्यक्तीनेच धनंजय मुंड आणि पंकजा मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. केवळ मंत्रीपदाचा नाही तर आमदारकीचाही राजीनामा दिला पाहिजे होता, असेही सारंगी महाजन यांनी म्हटले आहे. सारंगी महाजन यांनी आज (शनिवार) संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
सारंगी महाजन म्हणाल्या की, धनंजय मुडेंचे टोळभैरव बीडला बिहारसारखं खराब करत आहेत. वाल्मिक कराडला फक्त आत घातले. धनंजयलाही आत घाला. त्याला सरकारी जेवण जेऊ द्या, अशी मागणी त्यांनी अजित पवारांकडे केली. सारंगी महाजन म्हणाल्या की, अजित दादा धनंजय बद्दल योग्य निर्णय घेतील. मस्साजोगच्या घटनेनंतर त्याने नैतिकतेच्या आधारे स्वतः दुसऱ्या दिवशीच राजीनामा द्यायला पाहिजे होता. तो बीडचे नेतृत्व करतो. त्याने आमदारकीचाही राजीनामा द्यावा.
धनंजय मुंडेबद्दलची दहशत बीडच्या जनतेमध्ये आहे. त्याचं विमान फार उंचावर गेलं आहे, ते बीडची जनताच खाली उतरवले. त्याला आत घेतले पाहिजे. त्याचे सर्व व्यवहार बाहेर काढावे. अशी मागणी सारंगी महाजन यांनी केली. मस्साजोगच्या घटनेमधील आरोपी वाल्मिक कराडवरुन महाजन यांनी धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडे यांच्यावरही आरोप केले.
‘धनंजय मुंडे आणि पकंजा मुंडेंचे हात बरबटलेलेल म्हणून भेटीला आले नाही’
मंत्री धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी मस्साजोगमधील सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची शनिवारी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. माझी आंबेजोगईच्या जमीनीचा कोर्टातून निकाल लागल्यानंतर त्या जमिनीचे पैसे आल्यास संतोष देशमुख यांच्या मुलांच्या कुटुंबियांच्या शिक्षणासाठी आपण मदत करु असेही सारंगी महाजन म्हणाल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचे दु:ख आणि माझे दु:ख एकसारखेच आहे. मी सोळा वर्षे एकटी लढत आहे. तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी अख्खे गाव उभे आहे. हाच काय तो फरक आहे. मी 11 वर्षे सामाजिक कार्य करीत आहे. सोळा वर्षांपूर्वीचे माझे दिवस मला आठवले. धनंजय मुंडे आणि पकंजा मुंडे यांनी कुटुंबाला भेट दिलेली नाही यावरुन त्यांचे या प्रकरणात हात किती बरबटले आहेत हे कळतं, असा गंभीर आरोप सारंगी महाजन यांनी केला.
धनंजयने जमीन व्यवहारात फसवले – सारंगी महाजन
माझ्या जमीनीच्या व्यवहारात धनंजयने मला फसवले. मी वारंवार त्याला सांगितले की, रजिस्ट्रेशन रद्द करुन तुझे पैसे घेऊन जा, मी ते पैस तसेच कपाटात ठेवले आहेत. खर्च देखील केले नाहीत, असे मी त्याला सांगितले. त्याची पत्नी राजश्रीला फोन करुन सांगत होते. मी त्याला फोन केला तर तो थेट म्हणाला की, मामी तुम्ही फॉलोअप ठेवला नाही. इतके दिवस आम्ही जमीन सांभाळत आहोत, असा तो बोलत होता. मी त्याच्यापेक्षा वयाने आणि मानाने मोठी असताना त्याने मला असे बोलणे शोभते का? त्याला लाज नाही वाटत का? तू जमीन सांभाळत होतास तर स्वत:हून पुढे का नाही आलास, असा सवाल सारंगी महाजन यांनी केला. त्या म्हणाल्या की, प्रत्येकाला जाताना सहा फुटाचा कपडा लागतो, इतकी जमीन घेऊन कुठे जाणार आहेस? असा उद्विग्न सवाल त्यांनी केला. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मुंडे साहेबांची कमवलेली इतक्या वर्षांची इज्जत घालविली आहे, असेही सारंगी महाजन म्हणाल्या. महायुती सरकारने बीड जिल्हयातील एकाच तालुक्याला परळीला दोन मंत्रीपदे कशासाठी दिली, असाही सवाल त्यांनी केला.
हेही वाचा : Ajit Pawar : राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये चाललं तरी काय? मंत्री धनंजय मुंडेंची शिर्डी अधिवेशनाला दांडी
Comments are closed.