सरस प्रदर्शनमधून 63 लाख 51 हजार 973रुपयांची विक्री, महिला बचत गटाच्या उत्पादनाना पसंती

गणपतीपुळे येथे 24 ते 28 डिसेंबर कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री 2025 मधून 63 लाख 51 हजार 973 रुपयांची विक्री झाली. 50 लाख 40 हजार 68 रुपये किंमतीची उत्पादन विक्री तर 13 लाख 11 हजार 905 रुपयांची खाद्य विक्री स्टॉलवरुन विक्री झाली आहे.

ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाननाची अंमलबजावणी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांसाठी संस्थीय बांधणी व क्षमता बांधणी निरंतर सुरु आहे. स्वयंसहाय्यता समूहातील महिलांची उपजीविका शास्वत व बळकट होण्यासाठी कामकाज सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजरपेठ उपलब्ध व्हावी या अनुषंगाने प्रादेशिक, विभाग व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे आयोजन होत असते. सन 2025-26 चे रत्नागिरी जिल्ह्याचे सरस प्रदर्शन व विक्री 2025 चे आयोजन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विदयमाने श्री क्षेत्र, गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आले होते.

सरस प्रदर्शनाला वाढणारा प्रतिसाद बघून यावेळी 83 स्टॉलची बांधणी करण्यात आली होती, ज्यामध्ये 64 उत्पादने स्टॉल व 19 फुड स्टॉल समुहांना उपलब्ध करुन देण्यात आले होते. या प्रदर्शनात ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादनाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मानले जाते. या प्रदर्शनामध्ये स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या कलात्मक वस्तु (बुरुड काम, गोधडी, लोकरीच्या विणकाम केलेल्या वस्तु, क्रेयॉनच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी इत्यादी), विविध प्रकारचे घरगुती मसाले (मच्छी मसाले, मटण मसाले,)पिठे, पापड (नाचणी, उडीद, लसूण, सोयाबीन, पालक, बीट, टोमॅटो, पोह्याचे, ओव्याचे इत्यादी), लोणची (आंबा, लिंबू, मिरची, आवळा, करवंद इत्यादी), कोकम, आगळ इत्यादी., कोकणी मेवा (काजूगर, काजू मोदक, आंबावडी, आमरस, आंबापोळी आवळा मावा, फणसपोळी, करवंद वडी, तळलेले गरे इत्यादी), विविध फळांची सरबते (जांभूळ सिरप, आंबा सिरप, काजू सिरप, आवळा सिरप इत्यादी), रस, कोकणी खाद्यपदार्थ (मोदक, आंबोळी, थालीपीठ, पुरणपोळी, घावणे, नारळवडी, ), जेवण, नर्सरी (आंबा कलमे, काजू कलमे, नारळ कलमे, चिकू कलमे, कोकम कलमे, विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे, बोन्साय इत्यादी), मध माफक दरात ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले. सरस कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.

Comments are closed.