इंग्लंड दौऱ्यापूर्वी 10 किलो वजन कमी करत, सरफराजने दिलं टीकाकारांना सडेतोड उत्तर!

भारतीय खेळाडू सरफराज खानवर नेहमीच टीका केली जात होती की, तो खूप जास्त वजनदार आहे. अनेकांनी त्याला ‘जाड’ म्हटले आहे आणि म्हणूनच उच्च-स्तरीय क्रिकेट खेळण्यास अयोग्य आहे अशाही त्याच्यावर टीका करण्यात आल्या. जरी महान सलामीवीर सुनील गावस्कर यांनी त्याच्या तंदुरुस्तीचा बचाव केला असला तरीसुद्धा खेळाडूची कामगिरी आणि क्रिकेट तंदुरुस्ती त्यांच्या शरीराच्या वजनापेक्षा जास्त महत्त्वाची आहे यावर भर देण्यात आला.

शुक्रवारी इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघात निवड झालेल्या सरफराजने अखेर या पैलूतही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलमध्ये मेगा लिलावात निवड न झाल्यानंतर, 27 वर्षीय सरफराज अलिकडच्या काळात त्याची तंदुरुस्ती सुधारण्यासाठी आणि अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. सडपातळ आणि तंदुरुस्त होण्याच्या त्याच्या प्रयत्नात आजकाल तो पूर्वीपेक्षा खूपच बारीक दिसतोय. सरफराजने एका महिन्यात तब्बल 10 किलो वजन कमी केले आहे.

खरं तर, गेल्या काही महिन्यांपासून, सरफराजचे संपूर्ण कुटुंब वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. ज्याचे लक्षणीय परिणाम दिसून आले आहेत. सरफराजचे वडील-सह-प्रशिक्षक नौशाद खान यांनी एका महिन्यात 12 किलो वजन कमी केले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना नौशाद खान यांनी सांगितले, आमचे संपूर्ण कुटुंब वजन कमी करण्याच्या मोहिमेवर लक्ष केंद्रित करत आहे. सरफराजने 6 आठवड्यात 9 किलो वजनही कमी केले आहे, जे सोपे नाही आणि तो अधिक वजन कमी करण्यासाठी उत्सुक आहे.असेही त्यांनी सांगितले.

सरफराज आणि मी दोघेही आठवड्यातून सहा दिवस मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी सुविधेतील जिममध्ये किमान एक तास व्यायाम करतो. मी फिरायला जातो, तर तो जवळजवळ एक तास क्लबमध्ये जॉगिंग करतो आणि त्यानंतर 30 मिनिटांचा पोहण्याचा सेशन असतो. माझा धाकटा मुलगा मोईन खान याचेही वजन खूप कमी झाले आहे.

आम्ही आमच्या जेवणात खूप कमी ऑलिव्ह तेल वापरतो, हे नौशाद यांनी सांगितले. याचा अर्थ असा की, सरफराज आता त्याच्या आवडत्या मांसाहारी पदार्थांवर – विशेषत चिकन आणि मटण बिर्याणीवर मेजवानी करत नाही, परंतु मधल्या फळीतील फलंदाजाने जाणीवपूर्वक त्याची फिटनेस सुधारण्यासाठी केलेला हा त्याग आहे.

Comments are closed.