…तर तेंडुलकर, गावस्कर महान खेळाडू बनलेच नसते; 17 किलो वजन घटवूनही संघात स्थान न मिळालेल्या सरफराजचं विधान चर्चेत

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात नुकतीच पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानने ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेसाठी सरफराज खान याला हिंदुस्थानच्या संघात स्थान मिळाले नव्हते. यावरून माजी क्रिकेटपटू आणि क्रीडा चाहत्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. ही मालिका सुरू असतानाच सरफराज खान याचा नवीन लूक समोर आला होता. त्याने तब्बल 17 किलो वजन कमी केले होते. आता हाच सरफराज मुंबईतील कांगा लीगमध्ये खेळत असून या दरम्यान त्याने केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
कांगा लीगमध्ये सरफराज खान पार्कोफोन क्रिकेटर्सकडून खेळत असून त्याने इस्लाम जिमखानाविरुद्धच्या लढतीत 42 चेंडूत 61 धावांची खेळी केली होती. यानंतर ‘मिड डे’ने सरफराज खानच्या हवाल्याने एक वृत्त दिले.
‘लहानपणी मी माझ्या कोचकडून (नौशाद खान) अनेक किस्से ऐकले आहेत. एकदा सुनील गावस्कर इंग्लंड दौऱ्याहून आल्यावर कांगा लीग खेळण्यासाठी पोहोचले होते. मला आणि मुशीरलाही या लीगमध्ये खेळण्याचा अभिमान आहे. मी या लीगमध्ये तीन वर्षांपूर्वी खेळलो होते. मुंबईच्या सर्व खेळाडूंनी या लीगमध्ये खेळायला हवे’, असे सरफराज म्हणाला.
कांगा लीगची सुरुवात 1948 मध्ये झाली होती. साधारणपणे पावसाळ्याच्या काळात ही लीग आयोजित होत असल्याने फलंदाजांना धावा करणे कठीण जाते. त्यामुळे बहुतांश खेळाडू याकडे दुर्लक्ष करतात. पण सरफराजच्या मते मुंबईच्या सर्व खेळाडूंनी ही लीग खेळली पाहिजे.
काही खेळाडूंना वाटते की आपण फॉर्म दाखवू शकलो नाही तर भविष्यात काय होईल, पण हाच विचार सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांनीही केला असता तर ते महान खेळाडू बनले नसते. मोठे खेळाडू ही लीग खेळले तर युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल. कांगा लीगमध्ये यशस्वी होणारा फलंदाज जगात कुठेही धावा करू शकतो, असेही सरफराज म्हणाला.
रोहितने वर्ल्ड कपपर्यंत खेळायलाच हवे! शालेय प्रशिक्षक दिनेश लाड यांची भावना
Comments are closed.