शशिकला नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत
40 जागा लढवणार : तामिळनाडू निवडणुकीपूर्वी अण्णाद्रमुकला धक्का
वृत्तसंस्था/ चेन्नई
तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीपूर्वी अण्णाद्रमुकलाला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय व्ही. के. शशिकला नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. शशिकला 24 फेब्रुवारी रोजी नवीन पक्षाची घोषणा करतील. त्या दिवशी पासुम्पोन येथे एक मोठी जाहीर सभा होणार आहे. या महत्त्वाच्या कार्यक्रमात त्या अधिकृतपणे त्यांच्या नवीन पक्षाचे नाव आणि धोरणे जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. त्याच दिवशी पक्षाचा ध्वजही लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
शशिकला बऱ्याच काळापासून सक्रिय राजकारणापासून दूर असल्या तरी आता त्या परत राजकारणात येण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. आगामी निवडणुकीत त्या किमान 40 जागा लढवण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात, गेल्या काही दिवसांपासून त्या आपल्या पोएस गार्डन येथील निवासस्थानी अनेक अण्णा द्रमुक आणि एएमएमके नेत्यांशी भेटून चर्चा करत असल्याचे समजते.
जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला फेब्रुवारी 2017 मध्ये अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस झाल्या. शशिकला यांना बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना बेंगळूरच्या परप्पन अग्रहार तुरुंगात ठेवण्यात आले होते.
Comments are closed.