मी दररोज अनेकांशी बोलतो, ‘त्या’ मुलीला फोन केला असेल तरी आठवत नाही: रणजीतसिंह नाईक निंबाळकर
फलटण डॉक्टर आत्महत्येप्रकरणी रणजितसिंग नाईक निंबाळकर फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे राज्यभरात एकच खळबळ माजली आहे. या तरुणीने तिच्या आत्महत्येसाठी (Suicide News) जबाबदार असलेल्या लोकांची नावं हातावर लिहून ठेवली होती. तसेच तिने रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. धुमाळ यांना लिहलेल्या पत्रात खासदार आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांचा उल्लेख केला होता. यावरुन फलटणच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. डॉक्टर तरुणीने पत्रात खासदाराचे नाव नमूद न केल्याने हा राजकीय नेता नेमका कोण, याचा उलगडा झाला नव्हता. त्यामुळे विरोधकांनी याचा संबंध भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांच्याशी जोडला होता. या पार्श्वभूमीवर रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना आपली बाजू स्पष्ट केली. (Satara Crime news)
मृत डॉक्टर तरुणीने सुसाईड नोटमध्ये जो खुलासा केला आहे, त्यामध्ये खासदार महोदयांचा फोन आला, अशी माहिती आहे. दैनंदिन जीवनात मी अनेकांना फोन करतो. पण महिला डॉक्टरने तिच्या चॅटमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की, खासदारांनी मला दम दिला, रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी दम दिला किंवा खासदारांच्या पीएने दम दिला. खासदारांनी केवळ माहिती घेतली एवढंच या तरुणीने आपल्या पत्रात म्हटले आहे. मात्र, काही लोकांनी अफवा पसरवल्या. उद्या फलटणमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम आहे. आम्ही कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे. डॉक्टर महिलेने आत्महत्येपूर्वी तिच्या आत्महत्येसाठी कोण दोषी होतं आणि काय घडलं हे सगळं पत्रात नमूद केले होते. मात्र, पत्रात नसलेल्या गोष्टींचा संबंध राजकारण करणे फलटणला नवीन नाही, असे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटले.
Satara News: मुलीशी बोललो होतो की नाही, ते आठवत नाही: रणजितसिंह निंबाळकर
फलटणमध्ये काहीही झालं तरी आमचं नाव बदनाम केले जाते. मी आता खासदार नाही. मग विद्यमान खासदारांचं नाव का बदनाम केले जात आहे. त्याच्या मागचं राजकारण काय आहे? मी कधीही त्या मुलीला फोन केला नाही. त्यासाठीच मी काल सीडीआर तपासण्याची मागणी केली. मृत डॉक्टर महिलेने स्वत: दोन आरोपींची नाव घेतली आहेत. मी दररोज तालुक्यातील सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलत असतो. पण त्या मुलीशी बोलल्याचं मला आठवत नाही. दिवसभरात अनेकांशी वेगवेगळ्या विषयांवर बोलत असल्याने कधी डॉक्टर महिलेशी फोन झाला असेल तर मला आठवत नाही. पण तरुणीने म्हटल्याप्रमाणे, खासदारांनी तिला पोलिसांची तुमच्याविषयी तक्रार आहे का? असे विचारले जरी असेल तर यामध्ये गैर काय आहे? पण मला असा कोणताही फोन झाल्याचे आठवत नाही.
तरुणीने आपल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, खासदारांनी मला विचारले आणि मी माहिती दिली. मात्र, विरोधकांनी माझ्या पीए आणि मी मुलीला दम दिला, असा गैरप्रचार केला. उद्या फलटणमध्ये होणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा हा प्रकार आहे. मुलीचे कुटुंबीय म्हणतात की, कोणीतरी हिरवे नावाचा पीए होता. पण माझ्याकडे कधीच हिरवे नावाचा व्यक्ती स्वीय सहाय्यक म्हणून नव्हता. किंबहुना फलटण तालुक्यात हिरवे नावाचा व्यक्तीच नाही, असे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ठणकावून सांगितले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.