सातारा पोलीस अधीक्षकांच्या रजेवरून भाजप आणि शिंदे गटात कलगीतुरा
सातारचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे 6 एप्रिलपर्यंत अर्जित रजेवर गेले असल्याचे समोर आल्यानंतर आता पालकमंत्री शंभूराज देसाई व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील जिल्हा परिषद संग्रामाचे हे नाटय़ आणखी पुढे कुठपर्यंत जाणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
20 मार्च रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदांसाठी एकीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदे गट एकत्रितरीत्या, तर दुसरीकडे भाजप आग्रही होती. अशातच राष्ट्रवादीच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याने सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांना उचलून नेले. यावेळी पोलिसांशी झालेल्या झटापटीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की होऊन त्यांचा हात रक्तबंबाळ झाला. याचदरम्यान खासदार नितीन पाटील यांनादेखील जिन्यावरून ढकलेले गेले. थेट लोकप्रतिनिधींवरच पोलीस चालून गेले. या रक्तरंजित राडय़ानंतर राष्ट्रवादी-शिंदे गट यांचा पदाधिकारी निवडीत पराभव झाला व भाजपचे अध्यक्ष-उपाध्यक्ष झाले. गेले 10 दिवस या घडामोडी सुरू असताना आता जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे सक्तीच्या रजेवर गेल्याचे सुरुवातीचे वृत्त होते. मात्र, पोलीस अधीक्षक दोशी हे सक्तीच्या रजेवर नसून, ते अर्जित रजेवर गेले असल्याचा निर्वाळा अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी दिला आहे.
ज्यांना जसे वाटते तसा अर्थ घ्यावा – जयकुमार गोरे
पालकमंत्री देसाई यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘तुषार दोशी यांच्या रजेविषयी ज्यांना जसे वाटते तसा अर्थ घ्यावा. कोणाला वाटत असेल सक्तीची रजा तर त्याने त्याचा आनंद घ्यावा. कोणाला वाटत असेल ती रजा अर्जित आहे तर त्याने तसे समजून घ्यावे,’ असा टोला जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.
पोलीस अधीक्षकांना रजेवर जायला सांगितले – पालकमंत्री
प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ‘उपसभापतींचे निर्देश हे पारित झालेले आहेत. त्यावर सभापतींचे निर्देश हे कायदेशीर तज्ञांच्या अभिप्रायासाठी प्रलंबित आहेत. आता हे सर्व प्रकरण विधिमंडळाच्या कक्षेत प्रलंबित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘विधिमंडळात सातारच्या या प्रकरणाची चौकशी केली जाईल. चौकशीचा जो अहवाल येईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल,’ असे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे अनुभवाअंती अशा प्रकरणात अशा वेळी संबंधित अधिकारी त्या पदावर राहू शकत नाही. जर त्या पदावर ते राहिले तर चौकशीला बाधा येऊ शकते. कदाचित यामुळेच दोशी यांना रजेवर जायला सांगितले असेल, असे माझे मत आहे.’
Comments are closed.