Satara news – रुग्णालय एक कोटींचं; रुग्ण मात्र बाहेरच! कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड
सातारा जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर आधीच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना, आता जावळी तालुक्यातील कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला आहे. एक कोटी तीस लाख रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे अजूनही 40 टक्के काम अपूर्ण असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच ठेकेदाराने संपूर्ण बिल काढल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे.
जावळी तालुक्यातील सर्वांत मोठे ग्रामीण रुग्णालय म्हणून कुडाळ येथील या रुग्णालयाकडे पाहिले जाते. या रुग्णालयावर सुमारे 130 गावांतील नागरिकांचा आरोग्यदृष्टय़ा मोठा भार आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या रुग्णालयाच्या इमारतीचे काम रखडले असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयाच्या इमारतीसाठी शासनाकडून एक कोटी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले नसतानाही ठेकेदाराने पूर्ण बिल काढल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
रुग्णालयाचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे त्याचा थेट परिणाम रुग्णांवर होत आहे. सध्या रुग्णालयात पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना बाहेर बसून उपचाराची वाट पाहावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उन्हाळा असो वा पावसाळा, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उघडय़ावरच थांबावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. रुग्णालयात आवश्यक उपकरणांचीही कमतरता असल्याचे समोर आले आहे. उपलब्ध असलेली साधनसामग्री अपुरी असल्याने डॉक्टरांना तपासणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच रुग्णालयातील अनेक पदे रिक्त असल्यामुळे उपलब्ध डॉक्टर आणि कर्मचाऱयांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. परिणामी रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडथळे निर्माण
होत आहेत.
दोनच डॉक्टर कार्यरत
कुडाळ ग्रामीण रुग्णालयात केवळ दोनच डॉक्टर कार्यरत असून, दोघांचीही एकाचवेळी उपस्थिती आवश्यक असतानाही आलटून-पालटून डय़ुटी करावी लागत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा राजेश स्वामी यांनी दिली. डॉक्टरांची संख्या अपुरी असल्यामुळे रुग्णांच्या तपासणीत विलंब होत असल्याची बाबही त्यांनी स्पष्ट केली.
ठेकेदारावर कारवाईची मागणी
रुग्णालयातील काही कर्मचारी कर्तव्याबाबत गांभीर्य दाखवत नसल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. काही वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याचा आरोपही रुग्णांनी केला आहे. त्यामुळे रुग्णालयातील एकूणच कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाबाबत स्थानिक ग्रामस्थ आणि माजी उपसभापती मालोजीराव शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एक कोटी तीस लाख रुपयांचे बिल काढले गेले, मात्र प्रत्यक्षात 40 टक्के काम अपूर्ण आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, संबंधित ठेकेदारावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
130 गावांच्या आरोग्याशी खेळ
कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचे रखडलेले बांधकाम, रिक्त पदे, अपुरी उपकरणे आणि अपूर्ण सुविधा, यामुळे सुमारे 130 गावांतील नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचे चित्र आहे. शासनाने मंजूर केलेला निधी खर्च होऊनही काम अपूर्ण राहिल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Comments are closed.