तरुणाची प्रेरणादायी कथा, यूपीएससीची सात वर्षे तयारी; सहा वेळा अपयश
यूपीएससी उत्तीर्ण होणाऱया विद्यार्थ्यांची युवकांची कहाणी प्रेरणादायी असते, मात्र असे उमेदवार असतात, जे ध्येयाच्या अगदी जवळ जाऊन अपयशी होतात, त्यांची मात्र चर्चा होताना दिसत नाही. यूपीएससीची तयारी करणारा निर्मल पवार हा त्यापैकीच एक. निर्मलने यूपीएससीची तयारी केली. तो मुलाखतीपर्यंत पोचला. पण 21 मार्कांमुळे मागे राहिला. त्याची निवड झाली नाही. त्याने सात वर्षे यूपीएससीची तयारी केली. त्यात सहा वेळा त्याला अपयश आले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अपयश येऊनही त्याने स्वतःला खचण्यापासून वाचवलं. आजही आशेची ज्योत घेऊन तो करीअर घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
सातारा येथील सैनिकी शाळेतून शिकणाऱया निर्मल पवारला सैन्यात जायचे होते. सैनिकी शाळेत शिकताना ही आवड त्याला निर्माण झाली. पुढे नाशिकच्या कॉलेजमधून त्याने इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. इंजिनीअर झाल्यावर त्याच्यापुढे अनेक पर्याय होते. मात्र त्याने यूपीएससीचा मार्ग निवडला. तो 2018 साली दिल्लीत पोचला. तिथे त्याने लायब्ररी, नोट्स, टेस्ट सीरिज… अशी जोरदार तयारी सुरू केली. पण त्याला वारंवार अपयश आले.
जणू काळ थांबला
यूपीएससीची परीक्षा म्हणजे जीवनशैली बनून जाते. दरवर्षी परीक्षा. आजूबाजूची मित्रमंडळी पुढे जातात, कुणाला नोकरी लागते, कुणाचे लग्न होते. तुम्हाला वाटतं काळ थांबून राहिलाय. सात वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेने आर्थिक दबाव येतो. लोकांचे सततचे प्रश्न असतात. ताण वाढतो. रात्री नीट झोप लागत नाही. भीती वाटते. मात्र कुटुंबाचे पाठबळ महत्त्वाचे ठरते, निर्मल पवार सांगतो.
आयुष्याला नवे वळण
सात वर्षांच्या गॅपनंतर करिअरला आकार देणे निर्मलसाठी सोपे नव्हते. डिग्री असली, तर इंडस्ट्रीयल कौशल्य हवे असते. यामुळे निर्मलने आता सोलार एनर्जी सेक्टरमध्ये व्यवसाय सुरू केला आहे. आता कुठे त्याची सुरुवात झाली आहे. अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, निर्मल सांगतो.
Comments are closed.