हाती चाकू, सनकी युवकाची पोलिसांनी कुंडली काढली; अल्पवयीन नाही 18 वर्षे पूर्णे, गुन्हा दाखल

सातारा: शहरातील एक धक्कादायक आणि चिंताजनक व्हिडिओ व्हायरल (Viral video) झाल्यानंतर साताऱ्यातील पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं आहे. एका अल्पवयीन शाळकरी मुलीला जबरदस्तीने पकडत, तिच्या गळ्याला चाकू लावून एका सनकी आशिकने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं, सुदैवाने उमेश आडगळे यांनी पाठिमागून येत या माथेफिरू तरुणाच्या हातातील चाकू काढून घेत मुलीची सुटका केली. त्यानंतर, परिसरातील नागरिकांना या तरुणास पोलिसांच्या (Police) स्वाधीन केल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधित युवक हा अल्पवयीन नसून 18 वर्षे पूर्ण असल्याने त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

साताऱ्यातील एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीवर हल्लाप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून संबंधित युवक अल्पवयीन नाही. आरोपीचे नाव आर्यन वाघमळे असून त्यास 18 वर्ष पूर्ण झाले आहेत. तो मूळ आरळे गावचा असून सध्या मोळाचा ओढा येथे वास्तव्यास आहे. घडल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी देखील आरोपी माथेफिरू युवकावर पोक्सो कायदा, विनयभंग, दुखापत करणे आणि आर्म ऍक्ट कायद्यांतर्गत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत, सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी माहिती दिली. दरम्यान, याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या शिवानी कळसकर यांनी देखील पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधत घडलेल्या घटनेबाबत चिंता व्यक्त करत परिसरात गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

उमेश आडगळे बनला देवदूत

शाळकरी अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून तिला ठार मारण्याची धमकी हा सनकी युवक देत होता. त्यावेळी, तेथील जमावाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने काही ऐकलं नाही. घाबरलेली लहान मुलगी वाचवा-वाचवा म्हणत होती, मला सोड सोड असे देखील बोलत होती. त्या झटापटीमध्ये मुलीच्या गळ्याला देखील जखम झाली आहे. दरम्यान, हे बघताच माथेफिरू युवकाच्या तावडीतून मुलीला वाचवायचे म्हणून उमेश आडगळे यांनी आपला जीव धोक्यात घालून धाडस केले, भिंतीच्या कठड्यावरुन आतमध्ये हळूवारपणे येत मुलाच्या हातातील चाकू काढून त्याला खाली पाडले. त्यामुळे, सुदैवाने मुलीला गंभीर दुखापत न होता, तिची सुटका झाली. उमेश हा तिच्यासाठी देवदूत ठरला.

परिसरात गस्त वाढवण्याची मागणी

दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारानंतर साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे शाळेच्या मुलींच्या आणि महाविद्यालयातील तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर येत आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा

माणिकराव कोकाटेंना व्यक्तीस्वातंत्र्य देणार की नाही? मंत्री विखे पाटलांकडून रम्मी व्हिडिओची पाठराखण

आणखी वाचा

Comments are closed.