महाराज आता तिकीट द्या नाहीतर दोरी द्या, इथंच…. उदयनराजे भोसलेंकडे समर्थकाची अजब मागणी

सातारा : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सातारा जिल्हा परिषद आणि अकरा तालुक्यातील पंचायत समितीची निवडणूक जाहीर झालेली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या 65 जागांसाठी निवडणूक होणार आहे. मसूर जिल्हा परिषद गटाचं आरक्षण सर्वसाधारण प्रवर्ग असं आहे. या गटातून साताऱ्याचे लोकसभा खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर तयारी करत आहेत. आज त्यांनी कुलदीप क्षीरसागर यांनी साताऱ्यात जलमंदिर येथे उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. कुलदीप क्षीरसागर यांनी उदयनराजे भोसले यांच्याकडे उमेदवारी द्या नाहीतर दोरी द्या फास घ्यायला अशी मिश्कील टिप्पणी केली आहे.

साताऱ्यात सुद्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवार आपल्याला पक्षाचे तिकीट कसे मिळेल याकडे लक्ष लावून बसले आहेत.खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर हे सुद्धा मसूर जिल्हापरिषद गटामधून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार आहेत.या आधी सुद्धा झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळलेली आहे. या आधी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून कुलदीप शिरसागर हे विधानसभेसाठी उमेदवार म्हणून इच्छुक होते.परंतु उदयनराजे भोसले यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी उमेदवारी मागे घेतली होती.त्यामुळे कुलदीप शिरसागर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपल्या उमेदवारीची मागणी उदयनराजे भोसले यांच्याकडे केली.

“आता उमेदवारी द्या नाहीतर दोरी द्या फास घ्यायला इथंच” अशी मिश्कील टिप्पणी  उदयनराजे भोसले यांच्यासोबत बोलत असताना कुलदीप क्षीरसागर यांनी केली. उदयनराजे भोसले यांना कुलदीप क्षीरसागर यांच्या वक्तव्यामुळं हसू आवरले नाही.

साताऱ्यात सर्व पक्ष स्वतंत्र लढणार?

साताऱ्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीमधील पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी “महायुतीत एकमत झाले तर ठीक आहे. *मात्र जर युती झाली नाही, तर प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढायला मोकळा आहे. प्रत्येक पक्षाची या जिल्ह्यात आपापल्या पद्धतीने ताकद आहे,” असे वक्तव्य केलं आहे.

आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बोलावलेल्या बैठकीस कोणी उपस्थित राहायचे, याचा निर्णय पक्षातील सर्वजण मिळून घेतील. मात्र बैठकीत काय निष्पन्न होईल, याचा अंदाज बांधता येणार नाही. एकमत न झाल्यास प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीवर निवडणूक लढवेल, अशी भूमिका मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मांडली.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.