सातारा जिल्हा परिषद अध्यक्षनिवडीवेळी राडा, सभापती निवडीपूर्वी जिल्हाधिकारी सतर्क, आदेश जारी

सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याचे राज्याच्या विधिमंडळात पडसाद उमटले होते. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना त्या राड्यात दुखापत झाली होती. यानंतर हा विषय राज्याच्या विधिमंडळात माडला गेला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दिवशी म्हणजेच 20 मार्चला झालेला राडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना महागात पडला, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचं सांगितलं जातं. 20 मार्चला ज्या प्रकारे सातारा जिल्हा परिषदेत राडा झाला तसा प्रकार सभापती निवडीवेळी होऊ नये यासाठी साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील सतर्क झाले आहेत. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हा परिषद सभापती निवडी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी दिले जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.

Satara ZP Election : जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवडी 4 एप्रिलला होणार आहेत. या निवडी शांततेमध्ये पार पाडल्या जाव्यात यासाठी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालय परिसरात जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.  सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडी दरम्यान झालेल्या राड्यानंतर जिल्हाधिकारी संतोष पाटील ॲक्शन मोडवर असल्याचं पाहायला मिळतंय.  4 एप्रिलला होणाऱ्या  सभापती निवडी दरम्यान सकाळी 7 वाजल्या पासून निवड प्रक्रिया होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या परिसरात 100 मीटर अंतराच्या आत मध्ये येण्यास सदस्य,पोलीस प्रशासन व अधिकाऱ्यांशिवाय इतरांना बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हा परिषद सभापती निवडीत काय घडणार?

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून आव्हान देण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना आमने सामने आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना पोलिसांनी सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यालयातून ताब्यात घेतल्यानं ते मतदान करु शकले नव्हते. तर, कामेश कांबळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यानं भाजपच्या बाजूनं मतदान केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या लता कर्णे यांनी भाजपला मतदान केलं तर फलटण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा जगताप यांनी भाजपला मतदान केलं होतं. शिवसेनेच्या कोरेगाव तालुक्यातील हणमंत जगदाळे (कोरेगाव कुमठे)
सारिका फाळके (सातारा रोड) यांनी भाजपला मतदान केल्यानं त्यांचं संख्याबळ 33 तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं संख्याबळ 30 वर आलं होतं. आता सभापती निवडीत नेमकं काय घडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.