निवडणूक आयोगाने ठरविले, तर 48 तासांत दुबार नावे कमी होतील! – सतेज पाटील

राजकीय पक्ष जर राज्यातील मतदार यादीतील दुबार नावे शोधून काढत असतील, तर निवडणूक आयोगाला ही नावे काढायला काय अडचण आहे, असा साधा सरळ सवाल उपस्थित करत, जर निवडणूक आयोगाने ठरवलेच, तर येत्या ४८ तासांत एक कोटींपेक्षा जास्त दुबार नावे कमी होतील, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला.

‘कोल्हापूर बॅण्ड पुरस्कार’ सोहळ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार सतेज पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दुबार मतदार असतील तर ते कोणत्या पद्धतीने काढले पाहिजेत, याबाबत इलेक्शन मॅन्युअलमध्ये स्पष्ट सूचना आहेत. पण केंद्रीय निवडणूक आयोग वेगळे सांगते, तर राज्य निवडणूक आयोग मॅन्युअल वेगळे सांगत असल्याने त्यातून संभ्रमावस्था निर्माण करण्यात येत असल्याचे सतेज पाटील यांनी निदर्शनास आणले. जर राजकीय पक्ष राज्यातील मतदार यादीतील दुबार नावे शोधून काढत असेल, तर निवडणूक आयोगाला अधिकृत नावे काढायला काय अडचण आहे? निवडणुकीत पराभूत झालेला वा निवडून आलेला उमेदवार निवडणूक आयोगाने दिलेल्या डाटावरूनच संपूर्ण माहिती काढत असतो, तर मग तुम्हाला का जमत नाही? असा सवाल उपस्थित करत, निवडणूक आयोगाने ठरवल्यास ४८ तासांत एक कोटीहून अधिक दुबार नावे मतदार यादीतून बाजूला होऊ शकतात, असा दावाही सतेज पाटील यांनी यावेळी केला. त्यामुळे मतदार बूथवरील लोड तर कमी होईलच; शिवाय यंत्रणासुद्धा कमी लागेल, असेही त्यांनी निदर्शनास आणले.

खड्डे भरण्यासाठी ५० कोटींचा निधी द्यावा

शहरातील खराब रस्तेप्रकरणी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात सर्वाधिक कर भरून, महाराष्ट्रातील तिजोरीत कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगून, शहरात शंभर कोटींच्या निधीतून रस्तेसुद्धा व्यवस्थित करण्यात आले नाहीत. त्यामुळे कोल्हापुरातील खड्डे भरण्यासाठी शासनाने तत्काळ ५० कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणीही सतेज पाटील यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी ५० कोटी रुपये देऊन, त्यांचा एक माणूस खड्डे भरले की नाही ते तपासण्यासाठी पाठवावा. कारण येथे काय होते, हे कोल्हापूरला माहिती असल्याचा सूचक टोलाही सतेज पाटील यांनी लगावला.

दोन समाजांत वाद लावून जिंकण्याचा महायुतीचा डाव

भाजप आणि महायुतीकडून दोन समाजांत भांडण लावण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. एकीकडे ‘हैदराबाद गॅझेट’ संदर्भात जीआर काढल्यानंतर ओबीसींवर अन्याय होणार नाही, असे म्हणायचे आणि दुसरीकडे वेगळी वक्तव्ये करायची, हा प्रकार महायुतीमधील गोंधळाची अवस्था असल्याचा आरोपही आमदार सतेज पाटील यांनी केला.

Comments are closed.