सत्यसाईबाबांचे जन्मशताब्दी वर्ष हे दैवी आशीर्वाद आहे

आंध्र प्रदेशात सोहळा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती : अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, सचिन तेंडुलकरही सहभागी

वृत्तसंस्था/पुट्टपर्ती, कोईम्बतूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती येथे सत्य साईबाबांच्या शताब्दी समारंभाला उपस्थित राहिले. याप्रसंगी त्यांनी सत्य साईबाबांचे हे जन्मशताब्दी वर्ष केवळ एक उत्सव नाही तर आपल्या पिढीसाठी एक दैवी आशीर्वाद असल्याचे सुतोवाच केले. आंध्रातील या सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे एका कृषी मेळाव्याला उपस्थिती लावत तेथे किसान सन्मान निधीचा 21 वा हप्ता जारी केला. याप्रसंगी 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी नैसर्गिक शेतीवर भर दिला.

पुट्टपर्ती येथे श्री सत्य साईबाबांच्या जन्मशताब्दी समारंभात सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी स्वागत केले. याप्रसंगी माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू, किंजरापु आणि जी. किशन रे•ाr देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘सत्य साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचा अनुभव हृदयस्पर्शी आहे. त्यांची जन्मशताब्दी ही केवळ आपल्यासाठी एक उत्सव नाही तर एक दैवी आशीर्वाद आहे. त्यांची शिकवण, प्रेम आणि सेवाभाव लाखो लोकांना मार्गदर्शन करत आहे. आज शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते आदिवासी वस्त्यांपर्यंत संस्कृती, शिक्षण आणि वैद्यकीय सेवांचा एक अविश्वसनीय प्रवाह दिसून येतो. बाबांचे लाखो अनुयायी कोणत्याही स्वार्थाशिवाय या कार्यात गुंतलेले आहेत. मानवतेची सेवा हीच माधवची सेवा आहे, हा बाबांच्या अनुयायांचा सर्वात मोठा आदर्श असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

वसुधैव कुटुंबकमचे जिवंत स्वरूप

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सत्य साईबाबांचे जीवन वसुधैव कुटुंबकमचे जिवंत स्वरूप होते. म्हणूनच, त्यांची जन्मशताब्दी आपल्यासाठी एक भव्य उत्सव बनली आहे. याप्रसंगी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याच्या उद्देशाने 100 रुपयांचे नाणे आणि टपाल तिकिट देखील जारी करण्यात आले आहे. हे नाणे आणि तिकिट त्यांच्या सेवाकार्य प्रतिबिंबित करते. मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी मोदींनी सत्य साईबाबांच्या मंदिर आणि समाधीला भेट देत पूजा केली. कार्यक्रमादरम्यान ऐश्वर्या राय-बच्चन हिने पंतप्रधान मोदींना पदस्पर्श करत आशीर्वाद घेतले.

'पीएम किसान' सप्ताह सुरू आहे

आंध्रातील समारंभानंतर पंतप्रधान तामिळनाडूतील कोईम्बतूरला पोहोचले. याठिकाणी त्यांनी दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 चे उद्घाटन केले. तसेच पीएम किसान सन्मान योजनेच्या 21 व्या हप्त्याचे वितरणही ऑनलाईन प्रणालीद्वारे केले. देशभरातील कोट्यावधी नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यात बुधवारी पीएम किसान योजनेंतर्गत 2 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

100 कोटी लोक सामाजिक सुरक्षेत समाविष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या 11 वर्षांत देशात असंख्य योजना सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांची सामाजिक सुरक्षा लक्षणीयरीत्या मजबूत झाली आहे. गरीब आणि वंचित लोक सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत येत आहेत. 2014 मध्ये देशातील फक्त 25 कोटी लोक सामाजिक सुरक्षेत समाविष्ट होते. आज बाबांच्या चरणी बसून ही संख्या जवळपास 100 कोटी झाल्याचे सुतोवाच करत असल्याचे ते पुढे म्हणाले.

4 कोटी मुलींना ‘सुकन्या समृद्धी’चा लाभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत सरकारने 10 वर्षांपूर्वी सुकन्या समृद्धी योजना सुरू केली, ज्यामध्ये मुलींच्या शिक्षणावर आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यावर लक्ष केंद्रित केले गेले. ही देशातील सर्वाधिक व्याजदर असलेल्या योजनांपैकी एक आहे. सध्या यातील रकमेवर 8.2 टक्के व्याजदर दिला जात आहे. आजपर्यंत, सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत देशभरातील 4 कोटींहून अधिक मुलींसाठी खाती उघडण्यात आली आहेत. या बँक खात्यांमध्ये 3.25 लाख कोटींहून अधिक रक्कम जमा करण्यात आल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

Comments are closed.