खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची खंडणी मागितल्याने खळबळ
सतीश भोसाले खोक्या भाई: आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्याशी जवळीक असलेल्या सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्या भाईने शिरुर गावातील दिलीप ढाकणे यांच्यासह त्याचा मुलगा महेश ढाकणेला मारहाण केली होती. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसलेच्या अटकेची मागणी जोर धरत आहे. तर सतीश भोसलेचे दररोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत. आता सतीश भोसले उर्फ खोक्या भाईनंतर त्याचा साडूचा प्रताप समोर आलाय.
एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या साडू विरोधात अहिल्यानगरच्या पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये एक कोटी रुपयांची खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत अरफान चव्हाण (गब्ब्या) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आजिनाथ सावळेराम खेडकर यांनी प्रशांत चव्हाण विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. जमीन खरेदीनंतर ताबा घेण्यासाठी गेलेल्या खेडकर कुटुंबीयांना प्रशांत अरफान चव्हाण (गब्ब्या) याने आणि त्याच्याबरोबर असलेल्या इतर नऊ जणांनी धमकी दिली होती होती. या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सात महिला आणि दोन पुरुषांवर गुन्हा दाखल केलाय.
ढाकणे पिता-पुत्रावर गुन्हा दाखल
खोक्या भाई विरोधात तक्रार केलेल्या ढाकणे पिता-पुत्रासह इतर दोघांवर शिरूर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी पोस्को आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोक्याचे नातेवाईक शालन भोसले यांच्या फिर्यादीवरून दिलीप ढाकणे, महेश ढाकणे, संदीप ढाकणे आणि राम ढाकणे या चौघा जणांविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला. ढाकणे पिता-पुत्रासह इतर दोघांनी फिर्यादीच्या मुलांना डुकरे पकडण्याचा फास लावण्यासाठी शेतात बोलावले होते. यानंतर फिर्यादीचे मुले शेतात फास लावायला गेले. दुसऱ्या दिवशी फासामध्ये डुक्कर पकडले गेले आहेत का? हे पाहण्यासाठी फिर्यादीचे मुले गेले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या मुलीला आणि मुलाला जातिवाचक शिवीगाळ केली. मुलीचे तोंड दाबून तिला शेतात पाडले आणि तिच्यासोबत विनयभंग करून तिच्या पोटात लाथाबुक्याने जबर मारहाण केली. तर मुलाच्या डोक्यात तलवारीने वार करून जिवे मारण्याचा उद्देशाने त्याला जबर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.