हा देश कुणाची खासगी मालमत्ता नाही, ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार – अभिजीत दीपके
दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन न करण्याचे आदेश सराकराने सीजेपीसह देशातील आंदोलनकर्त्याना दिले. यानंतर सीजेपीचे सहसंस्थापक आशुतोष रांका आणि प्रवक्ता सौरव दास यांनी पुन्हा जंतर मंतरवर जाऊन तिरंगा फडकवत ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी घोषणाबाजी केली. यामुळे पोलिसांनी सौरव आणि आशुतोष यांच्यासह इतर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त करत CJP चे प्रमुख अभिजीत दिपके यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. जंतरमंतरवर तिरंगा फडकवणे हा जर गुन्हा असेल, तर अशा विचारसरणीचे लोक देशद्रोही आहेत, अशा शब्दांत दीपके यांनी सरकारला फटकारले.
अभिजीत दिपके यांच्या आजीचे निधन झाल्यामुळे ते सध्या हिंगोलीत आहेय आणि तिथूनच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सौरव दास, आशुतोष रांका यांच्यासह आंदोलनकर्त्यांच्या अटकेचा निषेध करत पोलिसांच्या कारवाईच्या कायदेशीर आणि नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आमची टीम आज सकाळी जंतरमंतरवर गेली आणि त्यांनी तिरंगा फडकवला. तिरंगा फडकवणे हा कधीपासून कायद्याचा भंग झाला? ज्या कोणाला असे वाटते की जंतरमंतरवर तिरंगा फडकवणे हा गुन्हा आहे, ते देशद्रोही आहेत. जर सौरभ दास, आशुतोष रांका, अजिंक्य शिंदे आणि इतर कार्यकर्त्यांना तिरंगा फडकवल्याबद्दल अटक केली जात असेल, तर याविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. तिरंगा फडकवल्याबद्दल तुम्ही कोणाला कसे काय अटक करू शकता? हा कोणता देश आहे? हे कोणते राज्य आहे? असे सवाल करत अभिजीत दीपके यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना कायदेशीर अधिकार नाकारल्यास तीव्र इशारा देत दिपके म्हणाले, संपूर्ण देश जंतरमंतर होईल. जंतरमंतर हे फक्त एक ठिकाण नाही, ती एक प्रतिकाराची भावना आहे. आम्हाला आशा आहे की दिल्ली पोलिसांनी त्यांना त्यांच्या वकिलांशी बोलू दिले जाईल. माझ्या बाबतीत घडले तसे, वकिलांशी बोलू न देता त्यांना 24 तास डांबून ठेवले जाऊ नये. कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांना वकिलांशी बोलण्याची परवानगी दिली पाहिजे. कारण तुम्ही अशा प्रकारे कोणालाही उचलून नेऊ शकत नाही, असा इशारा अभिजीत दीपके यांनी दिला.
सरकार सार्वजनिक ठिकाणांना आपली खासगी मालमत्ता समजत असल्याचा आरोप त्यांनी केला. जनता जंतर मंतरवर जाऊन तिंरगा फडकवून आंदोलन करते, ते या हुकमशाही सरकारला मान्य नाही. त्यांना वाटते की हा संपूर्ण देश त्यांची खासगी मालमत्ता आहे. पण तसे नाही, जंतर-मंतर हे या देशातील 140 कोटी जनतेचे आहे, आम्ही लढत राहणारचं, अशी स्पष्ट भूमिका अभिजीत दीपके यांनी मांडली.
मागणी पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच राहणार
आपली मुख्य मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा अभिजीत दिपके यांनी केली. आम्ही तिथे तिरंगा फडकवणार आणि ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत तो फडकवतच राहणार, असा इशारा अभिजीत दीपके यांनी दिला.
Comments are closed.