बचतीपासून गुंतवणुकीकडे: तुमचे पैसे तुमच्यासाठी कसे काम करतील? लेखिका अल्पा यांची माहिती

भारतीय घरांमध्ये पैशांचा पहिला धडा बचतीपासूनच सुरु होतो. लहानपणी आपण भिशी किंवा पिगी बँकेत पैसे टाकतो. नंतर फिक्स डिपॉझिटमध्ये आणि पुढे सुरक्षित ठिकाणी. पण फक्त इथेच थांबलो, तर आपण शर्यतीला धावलो पण फिनिश लाईन पारच केली नाही, असा अर्थ होईल. खरं आर्थिक स्वातंत्र्य तेव्हा मिळतं, जेव्हा तुमचे पैसे फक्त पडून न राहता तुमच्यासाठी काम करतात म्हणजेच गुंतवणूक. दरम्यान, बचतीपासून गुंतवणुकीकडे यासंदर्भात लेखिका, सामाजिक उद्योजक आणि वित्त प्रशिक्षक अल्पा शाह यांनी माहिती दिली आहे.

फक्त बचत पुरेशी का नाही?

बचत अल्पकालिन गरजा आणि आपत्कालिन प्रसंगांसाठी आवश्यक आहे. पण फक्त बचत खाते किंवा FD वरच अवलंबून राहिलात, तर महागाई हळूहळू पैशांची खरेदीशक्ती कमी करते.
उदा.: महागाई 6 टक्के आणि FD व्याज 5 टक्के असेल, तर प्रत्यक्षात तुमची संपत्ती वर्षागणिक घटते. म्हणूनच संपत्ती वाढवायची असेल तर बचतीपलिकडे जाऊन गुंतवणूक आवश्यक आहे.

बचत विरुद्ध गुंतवणूक

बचत: बँक खाते/FDसारखी सुरक्षित पण तुलनेने कमी परतावा देणारी साधनं मूळ रक्कम सुरक्षित, पण महागाईवर मात्र कठीण.

गुंतवणूक : शेअर्स, बाँड्स, म्युच्युअल फंड्स, सोने, रिअल इस्टेट इ. मध्ये पैसा लावून दीर्घकालीन वाढ साधणं.

बचत आजची सुरक्षितता देते. गुंतवणूक उद्याची समृद्धी घडवते.

बचतीपासून गुंतवणुकीकडे कसे जावे?

1) सुरक्षा कवच तयार करा

6 ते 9 महिन्यांच्या खर्चाइतका आपत्कालीन निधी ठेवा.
पुरेसा आरोग्यविमा आणि जीवनविमा घ्या.
यामुळे आकस्मिक प्रसंगात गुंतवणूक मोडावी लागत नाही.

2) लहान सुरुवात, सातत्य ठेवा

500 रुपये ते 1,000 रुपये दर महिन्याला SIP ने सुरुवात करा. सातत्यामुळे चक्रवाढ (compounding) काम करतं.

3) उद्दिष्टांशी गुंतवणूक जोडा

लघुकालीन (1–3 वर्षे): डेट फंड/RDसारखी सुरक्षित साधनं.

मध्यमकालीन (3–5 वर्षे): बॅलन्स्ड/हायब्रिड फंड.

दीर्घकालीन (5+ वर्षे): इक्विटी व इक्विटी म्युच्युअल फंड्स.

4) जोखीम समजून घ्या, विविधीकरण करा

प्रत्येक गुंतवणुकीत जोखीम असते. विविधीकरण केल्याने चढउतारांचा परिणाम कमी होतो.

5) घाबरू नका-तपासणी करा

मार्केट वर- खाली होतंच. वर्षातून 1–2 वेळा पोर्टफोलिओची तपासणी करा आणि गरजेनुसार छोट्या सुधारणा करा.

लोकांमधले काही गैरसमज

1) गुंतवणूक फक्त श्रीमंतांसाठी

गुंतवणूक फक्त श्रीमंतांसाठी आहे हे चुकीचं आहे. आज डिजिटल प्लॅटफॉर्मवर 100 पासूनही सुरुवात शक्य आहे.

2) गुंतवणूक फार धोकादायक

गुंतवणूक फार धोकादायक आहे. पण गुंतवणूक न करणं अधिक धोकादायक; महागाई बचत खाऊन टाकते.

3) जास्त पैसे झाले की गुंतवणूक करेन

उशीर केला की चक्रवाढीचे वर्षं निघून जातात. सर्वोत्तम वेळ काल; दुसरा सर्वोत्तम आज.

महिला आणि गुंतवणूक: खास संदेश

गेल्या दोन दशकांत अनेक कमावत्या महिलांनी निर्णय इतरांवर सोपवलेले पाहिले. आता महिलांनी बचतदार न राहता गुंतवणूकदार होणं गरजेचं आहे. पैशांवर नियंत्रण म्हणजे फक्त आर्थिक स्वावलंबन नाही, तर स्व-शक्तीकरण.

अंतिम विचार

बचत सुरक्षितता देते, गुंतवणूक वाढ देते, दोन्ही मिळूनच खरं आर्थिक स्वातंत्र्य घडतं. मी स्वतः 10 लाखांहून अधिक लोकांना वित्तीय साक्षरतेचं प्रशिक्षण दिलं आहे आणि सातत्यपूर्ण छोट्या सवयी कशा आयुष्य बदलतात हे पाहिलं आहे.

लक्षात ठेवा : फक्त पैशांसाठी काम करू नका; तुमचे पैसेही तुमच्यासाठी काम करतील याची काळजी घ्या.

आणखी वाचा

Comments are closed.