SBI नं नियम बदलला, आता ‘या’ व्यवहारांसाठी खातेदारांना पैसे मोजावे लागणार,जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेदारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. बँकेनं IMPS व्यवहारासंदर्भातील शुल्कामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँकेनं या बदलांची अंमलबजावणी 15 ऑगस्ट 2025 पासून करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलाचा परिणाम ऑनलाइन आणि शाखेतून होणाऱ्या व्यवहारांवर परिणाम होणार आहे. मात्र, छोट्या रकमेचे व्यवहार अजूनही मोफत असतील. मोठ्या रकमेच्या ऑनलाइन व्यवहारांवर नाममात्र शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. शाखांमधून होणाऱ्या व्यवहारांबाबत आयएमपीएस शुल्कांबाबत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

स्टेट बँक ऑफ इंडियानं केलेले बदल ऑनलाइन आणि शाखांच्या पातळीवर वेगवेगळे लागू असतील. काही स्लॅबमध्ये नव्यानं शुल्क लागू होतील तर काहीमध्ये बदल झालेला नसेल. ऑनलाइन यूजर्ससाठी 25000 रुपयांपर्यंतचे व्यवहार मोफत असतील. मात्र, 25 हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांवर शुल्क द्यावं लागेल. या नियमांची अंमलबजावणी 15 ऑगस्ट 2025 पासून करण्यात येईल. पगाराच्या खात्यांतून केल्या जाणाऱ्या व्यवहारांना यातून सूट लागू असेल. आयएमपीएस सेवा 24 तास उपलब्ध असते. नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ही सेवा दिली जाते. आयएमपीएस द्वारे करण्यात येणाऱ्या व्यवहारांची मर्यादा 5 लाख रुपये आहे.

स्टेट बँक किती शुल्क आकारणार?

ऑनलाइन पद्धतीनं IMPS पेमेंट करण्यासाठी 25 हजार ते 1 लाख रुपयांच्या व्यवहारांवर 2 रुपये आणि जीएसटी शुल्क आकारलं जाईल. तर, 1 लाख रुपये ते 2 लाख रुपयांदरम्यानच्या व्यवहारांवर 6 रुपये आणि जीएसटी शुल्क आकारलं जाईल. 2 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी 10 रुपये शुल्क आणि जीएसटी आकारला जाईल. यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया या रकमेच्या आयएमपीएस व्यवहारांवर शुल्क आकारत नव्हतं.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांमधून केल्या जाणाऱ्या आयएमपीएसच्या शुल्कामध्ये बदल करण्यात आला नाही. किमान शुल्क 2 रुपये आणि जीएसटी  तर कमाल शुल्क 20 रुपये आणि जीएसटी असं आहे.

कॅनरा बँकेच्या खातेदारांना 1 हजार रुपयापर्यंतच्या आयएमपीएस व्यवहारांवर शुल्क द्यावं लागत नाही. 1 हजार ते 10 हजार रुपयांच्या व्यवहारादरम्यान 3 रुपये आणि जीएसटी शुल्क द्यावं लागेल.  तर, 10 हजार ते 25 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर  5 रुपये आणि जीएसटी शुल्क द्यावं लागतं. 25 हजार रुपये ते 1 लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 8 रुपये आणि जीएसटी शुल्क आकारलं जाईल. 1 लाख रुपये ते 2 लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 15 रुपये आणि जीएसटी शुल्क बँक आकारलं जातं. तर, 2 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार एखाद्या ग्राहकानं केल्यास त्याला 20 रुपये शुल्क आणि जीएसटी द्यावा लागेल.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.