गुहागरच्या खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात बोगस प्रवेश अन् करोडोंचा गैरव्यवहार, भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप

गुहागर तालुक्यातील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात प्रथम, द्वितीय वर्षाचा प्रवेश बोगस दाखवून त्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचे थेट पदवी प्रमाणपत्र दिले जाते. यामध्ये करोडो रूपयांचा गैरव्यवहार आहे. हे सर्व बोगस प्रवेश घेणारे विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत. आपण याची गांभीर्याने दखल घेऊन अशा विद्यार्थ्यांची पदवी रद्द करा, शिक्षणसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करा. या प्रकरणात विद्यापीठाची चौकशी करा, अशी मागणी गुहागरचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी अधिवेशनात केली.
आमदार भास्कर जाधव पुढे म्हणाले की, हा प्रकार 18 डिसेंबर 2024 रोजी महाविद्यालयांमधील तीन प्राध्यापकांना बेदम मारहाण झाली त्यानंतर उघडकीस आला आहे. त्यादिवशी त्या मारहाण झालेल्या प्राध्यापकांची तक्रारही पोलिसांनी दाखल केली नव्हती. तेव्हा अधिवेशनात मी हा विषय मांडला त्यानंतर ही तक्रार दाखल झाली, असे भास्कर जाधव यांनी सांगितले.
राज्याबाहेरून येणारे हे विद्यार्थी 25 ते 30 लाख रूपये देतात. पहिल्या व दुसऱ्या वर्षाला महाविद्यालयात बसतच नाहीत. थेट पदवी घेऊन जातात, असा धक्कादायक प्रकार कोकणात सुरू असल्याचा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला.
भास्कर जाधव यांच्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशात गैरव्यवहार झाल्याचे कबूल केले. यापुढे याशिक्षणसंस्थेवर शासकीय प्रशासक आणू असे त्यांनी सांगितले. पुढील वर्षापासून या महाविद्यालयात परीक्षा होणार नाहीत. परीक्षा परिसरातील इतर तीन महाविद्यालयांमध्ये होतील असे आश्वासन दिले.
Comments are closed.